शासनाच्या योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचवा - कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर






·        उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान कार्यशाळेचा समारोप
वाशिम, दि. १५ : शेतकऱ्यांचे उत्पन्न त्याच्या उत्पादन खर्चाच्या दुप्पट करण्यासाठी ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या कृषी विषयक सर्व योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचविण्याचे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात आयोजित उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानाविषयक कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक एस. आर. सरदार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. डी. एम. मानकर, विस्तार संचालक डॉ. पी. जी. इंगोले आदी उपस्थित होते.
ना. फुंडकर म्हणाले की, तोट्यामध्ये असलेल्या शेतीला नफ्यात आणण्यासाठी कृषी विभागाने उन्नत शेती, समृद्ध शेतकरी हे अभियान हाती घेतले आहे. यामध्ये कृषी विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. शेतकऱ्यांना कमी उत्पादन खर्चात अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी मार्गदर्शन करणे, शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देणे, चांगल्या प्रतीचे बियाणे, खत त्यांचापर्यंत पोहोचविणे, शेतकरी व शेतमालाला संरक्षण देणे आणि त्यांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री करण्यासाठी मार्गदर्शन करणे, हा या अभियानाचा उद्देश आहे. त्यासाठी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञाचा वापर वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे. याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण व शासकीय योजनांच्या माध्यमातून मदत देण्यात येणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. याकरिता कृषी विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना अभियानाच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित केले जात आहे. या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेतकरी बांधवांच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम करावे. या अभियानामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव केला जाईल. तसेच जे या अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये कुचराई करतील, त्यांचावर कारवाई करण्याचा इशाराही ना. फुंडकर यांनी यावेळी दिला.
कृषी व पणन राज्यमंत्री ना. खोत म्हणाले की, आपल्या शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी करतो. त्याच्या मदतीसाठी शासनाने अनेक योजना आणल्या आहेत. या योजना सर्वांनी मिळून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान राबविले जात आहे. शेतकरी उत्पादक गटांच्या माध्यमातून गावागावांत अवजार बँकची निर्मिती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे. प्रधानमंत्री पीक योजनेमध्ये सर्व शेतकऱ्यांना समाविष्ट करून त्यांच्या पिकांना संरक्षण देण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. हे अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शासकीय योजनांची माहिती त्यांना द्यावी. शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी खा. गवळी, आ. पाटणी, अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक श्री. सरदार यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले, आभार प्रदर्शन उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी केले. बुलडाणा कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम अधिकारी डॉ. जायभाये यांनी उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानाविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. गेल्या वर्षामध्ये विविध योजनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कारही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे