पदवीधर मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याचे आवाहन

वाशिम, दि. १५ : भारत निवडणूक आयोगाने दिनांक १ नोव्हेंबर २०१६ या अर्हता दिनांकावर आधारित अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये नोंदणी कार्यक्रम घोषित केला आहे. यापूर्वी नोंदणी करण्यात आलेली जुनी सर्व नोंदणी व मतदार याद्या रद्द झाल्यामुळे सर्व पदवीधरांची नव्याने नोंदणी करण्यात येत आहे. तरी अद्याप नाव नोंदणी न केलेल्या पदवीधारकांनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदविण्याचे आवाहन विभागीय आयुक्त तथा अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे नाव नोंदणी अधिकारी जे. पी. गुप्ता यांनी केले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
पदवीधर मतदार यादीमध्ये नाव नोंदणी नमुना १८ द्वारे दिनांक ५ नोव्हेंबर २०१६ पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.  दिनांक १९ नोव्हेंबर २०१६ पर्यंत हस्तलिखीत तयार करणे व प्रारूप मतदार याद्यांची छपाई, दिनांक २३ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी, दिनांक २३ नोव्हेंबर २०१६ ते दिनांक ८ डिसेंबर २०१६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारणे, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे दिनांक २६ डिसेंबर २०१६ असून दिनांक ३० डिसेंबर २०१६ रोजी मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रमाकरिता अमरावती विभागातील सर्व जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना सहायक मतदार नोंदणी अधिकारी व तहसीलदार यांना पदनिर्देशीत अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. दिनांक १ नोव्हेंबर २०१६ पूर्वी पदवीधर झालेल्या व्यक्तीला पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करता येईल. नोंदणीकरिता नमुना १८ अर्ज, पदवी/पदवीका प्रमाणपत्र, रहिवासी पुरावे, छायाचित्रासहीत संबंधीत मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी व पदनिर्देशीत अधिकारी यांच्याकडे दिनांक ५ नोव्हेंबर २०१६ पूर्वी कार्यालयीन वेळेत जमा करावेत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे