नगरपरिषद निवडणुकांमध्ये आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणार - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी


·       पूर्व तयारीच्या अनुषंगाने पत्रकारांशी संवाद
·        निवडणूक सनियंत्रण समिती स्थापन होणार
·        नोडल अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
वाशिम, दि. १९ : जिल्ह्यातील तीन नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून त्यासाठी दिनांक १७ ऑक्टोंबर २०१६ पासून आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यातील तीनही नगरपरिषद क्षेत्रात या आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून यासाठी निवडणूक सनियंत्रण समिती स्थापन करण्यासह इतर उपाययोजना करणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
याप्रसंगी वाशिमचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संदीपान सानप व मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शेटे, नगरपालिका प्रशासन विभागाचे श्याम जोशी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील वाशिम, कारंजा व मंगरूळपीर या तीन नगरपरिषदांसाठी २७ नोव्हेंबर २०१६ रोजी मतदान होणार आहे. याकरिता दिनांक २४ ते २९ ऑक्टोंबर २०१६ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार आहेत. ही नामनिर्देशनपत्रे ऑनलाईन पध्दतीने भरणे आवश्यक असून त्यांची प्रिंट काढून ती स्वाक्षरीसह निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे जमा करावी लागणार आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी व वैधरीत्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी दिनांक २ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीवर अपील नसल्यास दिनांक ११ नोव्हेंबर २०१६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची मुदत असणार आहे. मात्र अपील असल्यास त्या अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल, त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची मुदत असेल. नामनिर्देशनपत्रे ऑनलाईन स्वरुपात स्वीकारली जाणार असली तरी ती मागे घेण्यासाठी अर्जदाराला प्रत्यक्ष उपस्थित राहूनच नामनिर्देशनपत्र मागे घ्यावे लागणार आहे.
नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर लगतच्या दिवशी निवडणूक चिन्हे नेमून देऊननिवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. दिनांक २१ नोव्हेंबर २०१६ रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध केली जाईल. तसेच या दिवसापर्यंत मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. आवश्यकता असल्यास दिनांक २७ नोव्हेंबर २०१६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान घेतले जाईल. दिनांक २८ नोव्हेंबर २०१६ रोजी सकाळी १० वा. पासून मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सांगितले.
निवडणुकीसाठी तीनही नगरपरिषद क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असून त्यासाठी व्हीडीओग्राफी सर्व्हेलन्स पथक, भरारी पथक व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली निवडणूक सनियंत्रण समितीची स्थापन करण्यात येणार असून ही समिती आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे या नगरपरिषद क्षेत्रांमध्ये आचारसंहितेचा भंग होईल, असे कृत्य केले जात असल्यास नागरिकांनी तातडीने संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी अथवा सनियंत्रण समितीला माहिती द्यावी . अशा प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे  जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सर्वांनी आचारसंहितेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
 वाशिम नगरपरिषदेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, मंगरूळपीरसाठी उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक व कारंजा नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शरद जावळे यांची नियुक्ती करण्यात आली असून संबंधित नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व एक नायब तहसीलदार हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. नगरपरिषद निवडणुकीसाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी प्रकाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिली.
नगरपरिषदेचे नाव
प्रभाग
निवडून द्यायचे
सदस्य संख्या
एकूण मतदार
मतदान केंद्र
वाशिम
१५
३०
६४८१९
८२
मंगरूळपीर
१८
२६९६५
३७
कारंजा
१४
२८
५७०२३
७३


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे