लोकसहभागातून जलसंवर्धन चळवळ वाढविण्याची गरज -जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी



·        जलयुक्त शिवार अभियान विषयक बैठक
·        जलसंवर्धन विषयक काम करणाऱ्या मान्यवरांचा सहभाग
वाशिम, दि. १६ :  दुष्काळाचे संकट दूर करण्यासाठी राज्य शासन जलयुक्त शिवार अभियान राबवीत आहे. यामाध्यमातून जलसंवर्धनासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र लोकसहभागातून व श्रमदानातून ही चळवळ वाढविण्याचा प्रयत्न असून याकरिता जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांमधील नागरिकांनी पुढे यावे, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबत जलसंवर्धन विषयक काम करणाऱ्या मान्यवरांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, कोणत्याही कामामध्ये लोकसहभाग मिळाल्याशिवाय ते काम यशस्वी होत नाही. त्यामुळे जलसंवर्धन चळवळीला शाश्वत स्वरूप द्यायचे असेल, तर त्यामध्ये लोकसहभाग वाढणे आवश्यक आहे. लोकांनी आपले गाव जलयुक्त करण्यासाठी सकारात्मक विचारांसह पुढे यावे. श्रमदानाच्या माध्यमातून गावांमध्ये जलसंधारणाची कामे सुरु करावीत. अशा कामांना प्रशासनाकडून आवश्यकतेनुसार सहकार्य केले जाईल. आपल्या गावासाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आपल्या गावासाठी आपण काहीतरी केले याचे समाधान मिळेल, तसेच गावामधील पाणी टंचाई दूर होण्यास मदत होईल. अभिनेता आमीर खान यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘पाणी फौंडेशन’द्वारे श्रमदानातून जलसंधारणाची कामे करणाऱ्या गावांची स्पर्धा घेऊन त्यांना बक्षीस दिले जाते. त्यामुळे श्रमदानातून जलसंवर्धन करण्याची चळवळ रुजत आहे.   या स्पर्धेकरिता वाशिम जिल्ह्यातूनही काही तालुक्यांची निवड व्हावी, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे आपल्या गावात जलसंवर्धनाची कामे श्रमदानातून करण्यासाठी गावकऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी केले.
यावेळी पाणी फौंडेशनमार्फत गेल्यावर्षी राज्यातील तीन तालुक्यात राबविण्यात आलेल्या स्पर्धेची, तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या गावांमधील जलसंधारणाच्या कामांची माहिती देणारी चित्रफित दाखविण्यात आली. सर्वप्रथम निवासी उपजिल्हाधिकारी श्री. हिंगे यांनी बैठकीच्या आयोजनाबाबत प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य गजानन अमदाबादकर, डॉ. निलेश हेडा, डॉ. सुधीर कवर, पांडुरंग ठाकरे, पांडुरंग महाले, डॉ. हरिष बाहेती, प्रा. हरिदास बनसोड, सचिन कुलकर्णी, सुभाष नानवटे यांनी आपले अनुभव कथन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जयंत शिंदे, वरिष्ठ भूजल वैज्ञानिक बळवंत गजभिये यांच्यासह जलसंवर्धनविषयी काम करणारे मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे