मतदार यादीत नाव नोंदविणे ही प्रत्येकाची जबाबदारी - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी


·        शासकीय विभाग प्रमुखांची बैठक
·        पदवीधर मतदार यादीत नाव नोंदणीचा आढावा
वाशिम, दि. १७ :  मतदार यादीमध्ये नाव नोंदविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सध्या सुरु असलेल्या पदवीधर मतदार नाव नोंदणी अंतर्गत सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांचे पदवीधर मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात झालेल्या सर्व शासकीय विभाग प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पी. एस. पाटील यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, भारत निवडणूक आयोग यांच्या निर्णयानुसार यापूर्वीची पदवीधर मतदार यादी रद्द करण्यात आली आहे. नवीन मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यासाठी दिनांक ५ नोव्हेंबर २०१६ पर्यंत नाव नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व पदवीधर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे नाव नोंदणी करण्याबाबत यापूर्वीच सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांचा नाव नोंदणी अर्ज पुढील सात दिवसांच्या आत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे पाठवावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी डॉ. बेडसे यांनीही उपस्थितांना आवश्यक सूचना दिल्या तसेच शंकांचे निरसन केले. पदवीधर मतदार नाव नोंदणीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राजपत्रित अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राच्या सहाय्याने नाव नोंदणी करता येणार
कोणत्याही खासगी व्यक्तीने नाव नोंदणी अर्ज (नमुना १८) सोबत राजपत्रित अधिकाऱ्याने दिलेले पदवीधारक, जिल्हातील रहिवासी असल्याचे व संबंधित व्यक्तीला ओळखत असल्यास प्रमाणपत्र दिले असल्यास त्या प्रमाणपत्राच्या आधारे पदवीधर मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करता येईल. मात्र त्या प्रमाणपत्रामध्ये संबंधित व्यक्तीचे नाव, पत्ता व पदवीविषयी स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यावेळी सांगितले. मोघम स्वरुपात अथवा एकगठ्ठा अर्जासोबत एकच मोघम प्रमाणपत्र जोडले असल्यास असे अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे