प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना नाव नोंदणी मोहिमेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद





वाशिम, दि. २३ : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान गावनिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. आज पहिल्याच दिवशी या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये व सामाईक सुविधा केंद्रांवर नाव नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी या योजनेच्या नाव नोंदणीसाठी गाव पातळीवर शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश तालुकास्तरीय यंत्रणांना दिले होते. तसेच या शिबिराला संबंधित गावाचे तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक यांनी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज पहिल्या दिवशी जिल्ह्यात विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करून लाभार्थी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. या शिबिरामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
शेतकऱ्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी सुरु करण्यात आलेल्या या योजनेमध्ये १८ ते ४० वयोगटातील २ हेक्टर पर्यंत शेती असलेल्या सर्व अल्पभूधारक व सिमांत शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल. वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याला ३ हजार रुपये प्रतिमाह पेन्शन मिळणार आहे. लाभार्थ्याचा मृत्यु झाल्यास त्याच्या कुटूंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची सुध्दा तरतुद या योजनेत आहे. १ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते ४० वर्षे वय असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असून त्यांना वयानुसार प्रतिमाह ५५ ते २०० रुपये रक्कम जमा करावी लागेल. सदर रक्कम ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. यात केंद्र शासनाकडून सुध्दा लाभार्थ्याद्वारे जमा केलेल्या रकमेऐवढी रक्कम जमा करण्यात येईल. नोंदणीनंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून लाभार्थी हिश्याची रक्कम ऑटो-डेबीटने विमा कंपनीकडे जमा होणार आहे.
नाव नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, गांव नमुना ८ अ व बँक पासबुक, बँक खाते क्रमांक, जन्म तारखेचा पुरावा, पत्नीचे नाव इत्यादी माहिती सोबत आणणे आवश्यक आहे. या नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना पंतप्रधान किसान मानधन योजनेचे पेन्शन कार्ड मिळणार आहे. शेतकऱ्यांची पडताळणी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या ओटीपीद्वारे होणार आहे.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नाव नोंदणी करून प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेमध्ये सहभागी होता यावे, याकरिता जिल्ह्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यात २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान गाव पातळीवर नाव नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व गावांमधील सामुहिक सुविधा केंद्रांवर सुद्धा नाव नोंदणी सुरु आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी या योजनेकरिता आपले नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर