प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेचा लाभ घ्या - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक
* नाव नोंदणीसाठी आयोजित शिबिरांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट
* १८ ते ४० वयोगटातील अल्प, अत्यल्प भूधारक शेतकरी पात्र
* वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळणार प्रतिमाह 3 हजार रुपये पेन्शन
वाशिम, दि. २४ : प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यातील १८ ते ४० वयोगटातील सर्व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सामाईक सुविधा केंद्रावर जाऊन या योजनेसाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नाव नोंदणी करून प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेमध्ये सहभागी होता यावे, याकरिता जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान गाव पातळीवर नाव नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मानोरा तालुक्यातील शेंदूजना आढाव, उज्ज्वल नगर, फुलउमरी, पाळोदी, मानोरा, साखरडोह तसेच मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी, हिसई, शेलुबाजार येथे आयोजित शिबिरांना आज जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच नोंदणी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना पेन्शन कार्ड वितरित केले.
यावेळी मंगरुळपीरचे तहसीलदार किशोर बागडे, मानोराचे तहसीलदार सुनील चव्हाण, गट विकास अधिकारी सूरज गोहाड यांच्यासह मानोरा व मंगरुळपीर तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, शेतकऱ्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी सुरु करण्यात आलेल्या या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर ३ हजार रुपये प्रतिमाह पेन्शन मिळणार आहे. लाभार्थ्याचा मृत्यु झाल्यास त्याच्या कुटूंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची सुध्दा तरतुद या योजनेत आहे.
१ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते ४० वर्षे वय असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असून त्यांना वयानुसार प्रतिमाह ५५ ते २०० रुपये रक्कम जमा करावी लागेल. सदर रक्कम ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. यात केंद्र शासनाकडून सुध्दा लाभार्थ्याद्वारे जमा केलेल्या रकमेऐवढी रक्कम जमा करण्यात येईल.
नोंदणीनंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून लाभार्थी हिश्याची रक्कम ऑटो-डेबीटने विमा कंपनीकडे जमा होणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी शेतकऱ्यांना केले.
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मिळणार पेन्शन कार्ड
नाव नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, गांव नमुना ८ अ व बँक पासबुक, बँक खाते क्रमांक, जन्म तारखेचा पुरावा, पत्नीचे नाव इत्यादी माहिती सोबत आणणे आवश्यक आहे. या नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. शेतकऱ्यांची पडताळणी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या ओटीपीद्वारे होणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना पंतप्रधान किसान मानधन योजनेचे पेन्शन कार्ड मिळणार आहे.
Comments
Post a Comment