प्रधानमंत्री किसान मानधन योजना नाव नोंदणीसाठी गावनिहाय विशेष शिबिरांचे आयोजन - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक



·         २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान होणार शिबीर
·         जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नाव नोंदविण्याचे आवाहन
वाशिम, दि. २१ : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थी नोंदणी व्हावी, यासाठी २३ ते २५ ऑगस्ट २०१९ दरम्यान जिल्ह्यात गाव पातळीवर विशेष नाव नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. याकरिता सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांनी समन्वयाने काम करून जास्तीत जास्त लाभार्थी नोंदणीसाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज वाकाटक सभागृहात झालेल्या बैठकीत दिल्या. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कालावधीत आपले नाव नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रमेश कटके, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्यासह तहसीलदार, सुविधा केंद्रांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, २५ ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या नोंदणी करावी, यासाठी गाव पातळीवर शिबीर आयोजित केले जाणार आहे. या शिबिराला तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्यासह संबंधित गावातील सामाईक सुविधा केंद्राच्या (कॉमन सर्व्हिस सेंटर) चालकाने यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. याकरिता सर्व तहसीलदार यांनी गट विकास अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी समन्वय साधून गाव निहाय शिबिराचे वेळापत्रक तयार करून संबंधितांना आदेशित करावे. गावात कोणत्या दिवशी, कोणत्या ठिकाणी हे शिबीर होईल, याबाबतची माहिती दवंडी व इतर माध्यमातून दिली जावी. शिबिराचे कामकाज व्यवस्थित होत असल्याची खात्री करण्यासाठी तालुका व जिल्हास्तरीय अधिकारी या शिबिरांना अचानक भेटी देतील. जे अधिकारी, कर्मचारी व सुविधा केंद्र चालक या शिबिरामध्ये जास्तीत जास्त नोंदणी करतील त्यांचा जिल्हा प्रशासनामार्फत सन्मान केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तहसीलदार, गट विकास अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने प्रयत्न करावेत. तसेच सामाईक सुविधा केंद्र चालकांनी सुद्धा शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. हिंगे यांनी योजनेचे स्वरूप व नाव नोंदणी प्रक्रियेची माहिती दिली.

नाव नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
·         आधारकार्ड
·         बँक खाते क्रमांक
·         जन्म तारखेचा पुरावा
·         मोबाईल क्रमांक

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे