मतदारांच्या सेवेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार सहाय्यता कक्ष



वाशिम, दि. २२ :  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिल रोजी तर अकोला लोकसभा मतदारसंघात १८ एप्रिल रोजी मतदान होत आहे. यानिमित्त मतदारांना मतदार यादीमध्ये नाव, अनुक्रमांक व मतदान केंद्र शोधण्यास मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी हृषीकेश मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा निवडणूक कार्यालयात मतदार सहाय्यता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अद्ययावत मतदार यादी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे मतदार यादीमध्ये नाव शोधणे, मतदान केंद्राविषयी माहिती मिळविण्यामध्ये समस्या येऊ नयेत, याकरिता मतदार सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याठिकाणी नियुक्त अधिकारी, कर्मचारी मतदारांना यादीमध्ये नाव, अनुक्रमांक व मतदान केंद्र शोधण्यासाठी मदत करतील.
१९५० क्रमांकावर मिळणार माहिती
जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या मतदार सहाय्यता कक्षामध्ये १९५० हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. १९५० या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन मतदारांना मतदार यादीतील नाव, अनुक्रमांक व मतदार केंद्राविषयीची माहिती प्राप्त करून घेता येणार आहे. तसेच आपली तक्रारही नोंदविता येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन यांनी केले आहे.
मतदानासाठी ११ प्रकारची ओळखपत्रे ग्राह्य
लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदार केंद्रावर ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्रासह मतदार ओळखपत्र नसलेल्या मतदारांना मतदान करण्यासाठी पासपोर्ट, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), छायाचित्र असलेले कमर्चारी ओळखपत्र (केंद्र किंवा राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम अथवा सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक, पॅन कार्ड, एनपीआर अंतर्गत आरजीआयद्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्ताऐवज, खासदार किंवा आमदार किंवा विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र व आधारकार्ड यापैकी कोणताही एक दस्ताऐवज सोबत आणावा लागणार आहे.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे