राज्य सेवा पूर्व परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू


वाशिम, दि. ०५ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी राज्य पूर्व परीक्षा २०१८,  रविवार, दि. ८ एप्रिल २०१८ रोजी वाशिम शहरातील सहा परीक्षा उपकेंद्रांवर सकाळी १०.३० ते दुपारी १ व दुपारी २.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अशा दोन सत्रात घेण्यात येणार आहे. एकूण १९२० परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. या सहाही परीक्षा उपकेंद्र परिसरात कलम १४४ नुसार प्रतीबंधातामिक आदेश लागू करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
राज्य पूर्व परीक्षा वाशिम शहरातील राजस्थान महाविद्यालय, श्री शिवाजी हायस्कूल, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, बाकलीवाल विद्यालय, एस. एम. सी. इंग्लिश स्कूल व रेखाताई कन्या शाळा या सहा परीक्षा उपकेंद्रांवर होत आहे. या सर्व परीक्षा उपकेंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्यामुळे परीक्षा उपकेंद्रांवर ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही. उपकेंद्राच्या १०० मीटर परिक्षेत्रात केंद्राधिकारी, पर्यवेक्षक, समवेक्षक, सहाय्यक कर्मचारी, परीक्षार्थी, परीक्षेसाठी नियुक्त समन्वय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडून नियुक्त केलेले अधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेशास मनाई राहील. उपकेंद्रावर १०० मीटरचे आत रस्त्यावरून वाहन नेण्यास मनाई राहील. परीक्षा उपकेंद्रांच्या १०० मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी., आय.एस.डी., झेरॉक्स, फॅक्स, ई-मेल, ध्वनीक्षेपक, इंटरनेट इत्यादी सुविधांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. परीक्षा उपकेंद्रावर मोबाईल फोन, वायरलेस सेट, रेडीओ, दूरदर्शन, कॅल्क्युलेटर, कॉम्प्यूटर वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. परीक्षा उपकेंद्रावर एकाचवेळी चारपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश करता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
परीक्षार्थींसाठी महत्त्वाच्या सूचना
राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र परीक्षार्थींनी स्वतः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावे. परीक्षेस येताना प्रवेशपत्रासोबतच स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड, पासपोर्ट किंवा वाहन चालविण्याचा परवाना (फक्त स्मार्टकार्ड प्रकारचा) यापैकी कोणतेही दोन मूळ ओळखपत्र व त्याची एक झेरॉक्स प्रत सोबत आणावी व ती स्वतःच्या स्वाक्षरीसह (सेल्फ अटेस्टेड) समवेक्षकाकडे जमा करणे अनिवार्य आहे.
परीक्षेमध्ये कॉपी, गैरप्रकार करताना आढळल्यास संबंधितावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची  पोलिस कर्मचाऱ्यांकडून तपासणी (फ्रीस्किंग) करण्यात येणार आहे. आयोगाकडून परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक, भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी स्वतः पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार आहेत. परीक्षार्थींनी परीक्षा हॉलमध्ये मोबाईल फोन, पेजर, इतर दूरसंचार साधने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे अथवा दूरसंचारासाठी वापरण्यात येणारी कोणतीही संपर्क साधने, पुस्तके, पेपर्स, अथवा परिगणक इत्यादी प्रकारचे अनधिकृत साहित्य जवळ बाळगण्यास अथवा त्याचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. परीक्षेकरिता नियुक्त केलेल्या समवेक्षकांना सुध्दा परीक्षेच्या दालनात मोबाईल नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. समवेक्षकांनी आपला मोबाईल केंद्र प्रमुखाकडे जमा करणे अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे