शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेतीपूरक व्यवसाय सुरु करा - सर्जेराव ढवळे



·        साखरा येथे ‘संवादपर्व कार्यक्रमात कृषीपूरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन
वाशिम, दि. ३० : शेतीवरील अवलंबित्व कमी करून शाश्वत उत्पन्नाचे साधन निर्माण करण्यासाठी शेतीला जोडधंदा असणे आवश्यक आहे. शेतीपूरक व्यवसाय निर्मितीसाठी शासन विविध योजना राबविते. या योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी छोटे-छोटे व्यवसाय सुरु करावेत, असे आवाहन समन्वयीत कृषी समृद्धी प्रकल्प (केम)चे व्यवस्थापक सर्जेराव ढवळे यांनी केले. साखरा येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने व गणेशोत्सव मंडळाच्या सहकार्याने आयोजित ‘संवादपर्व’ कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी साखराचे उपसरपंच मोहन इंगळे, आदर्श गाव समितीचे अध्यक्ष रामराव इंगळे, शाळा व्यवस्थापन समितीचे रामप्रसाद इंगळे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर इंगळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप, दिलीप काळे, प्रमोद राठोड, ग्राम कार्यकर्ता सुखदेव इंगळे आदी उपस्थित होते.
श्री. ढवळे म्हणाले की, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांचे शेतीवरील अवलंबित्व कमी होऊन उत्पन्नाची इतर साधने निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतीला पूरक जोडधंदा हा चांगला पर्याय आहे. दुग्ध व्यवसाय, मत्स्यव्यवसाय, शेळी पालन, कुक्कुट पालन, मशरूम शेती यासारखे अनेक छोटे-छोटे शेतीला जोडधंदा म्हणून करता येणे शक्य आहे. त्याकरिता शासनामार्फत विविध योजनांमधून अनुदान सुध्दा उपलब्ध करून देण्यात येते. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतीतून उत्पादित होणाऱ्या मालावर प्रक्रिया करणारा उद्योग उभारल्यास शेतीमालाला चांगला दर मिळण्यासाठी मदत होऊ शकते. अशा उद्योगांना कृषी विभागाच्या योजना व बँकांमार्फत अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. बोराडे म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. मानवाने मोठ्या प्रमाणात केलेली वृक्षतोड व पर्यावरणाची झालेली हानी यासाठी कारणीभूत आहे. तसेच भूगर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने भूजल पातली खालावली आहे. त्यामुळे पाणी टंचाईसारख्या संकटांना सामोरे जावे लागते. शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवून भूजल पातळीत वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये नागरिकांनीही सक्रीय सहभाग नोंदवावा. तसेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रास्ताविकामध्ये श्री. घोलप यांनी ‘संवादपर्व’ कार्यक्रमाचा हेतू विषद केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणाऱ्या ‘मी मुख्यमंत्री बोलतोय...’ या कार्यक्रमाच्या मुद्रित पुस्तिकेचेही यावेळी वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्राम कार्यकर्ता सुखदेव इंगळे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे