सर्व गरीब कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ द्या - किशोर तिवारी


·        जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत विविध योजनांचा आढावा
·        केम, आत्माच्या माध्यमातून शेतीपूरक रोजगार निर्मिती करा
·        शेतमाल तारण योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा
वाशिम, दि. २२ : जिल्ह्यातील सर्व गरीब वंचित कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना कै. वसंतराव शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. याप्रसंगी त्यांनी कृषी, आरोग्यविषयक योजनांचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील कोरडे, उपविभागीय महसूल अधिकारी राजेश पारनाईक, डॉ. शरद जावळे, अभिषेक देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. डी. एल. जाधव, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, जिल्हा पणन अधिकारी श्री. ढाकरे, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. जे. एम. जांभरूणकर, तहसीलदार बळवंत अरखराव आदी उपस्थित होते.
श्री. तिवारी म्हणाले की, जिल्ह्यातील एकही गरीब व्यक्ती अन्नापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. याकरिता अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये जिल्ह्यातील सर्व गरीब, वंचित कुटुंबांचा करण्यात यावा. नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे असून जिल्हा सामान्य रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील आरोग्य सुविधाचा दर्जा कायम राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा. महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी यामध्ये समाविष्ट हॉस्पिटलची संख्या वाढविण्याचा प्रयत्न करा व जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ देण्याच्या सूचनाही श्री. तिवारी यांनी यावेळी केल्या.
शेतकऱ्यांचे शेतीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केम, आत्माच्या माध्यमातून शेती पूरक उद्योग उभारणीला चालना देऊन रोजगार निर्मिती करण्याची गरज आहे. याकरिता शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून बिजोत्पादन, शेतीमाल प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही श्री. तिवारी यांनी यावेळी दिल्या. शेतकऱ्यांना शेतमाल तारण योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्साहित करा. शेतमालाला योग्य दर मिळण्यासाठी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल, असेही ते म्हणाले. श्री. तिवारी यांनी यावेळी महावितरण, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, ग्रामीण विकास यंत्रणा, प्रेरणा प्रकल्प, पीक कर्ज वाटप आदीचा आढावा घेतला.

*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे