स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना उत्तर लेखनाचा सराव आवश्यक - सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आसिया


·        जिल्हा प्रशासनाची स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा
·        नायब तहसीलदार लक्ष्मण बनसोडे यांनीही केले मार्गदर्शन
·        युपीएससी, एमपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीचा दिला कानमंत्र
वाशिम, दि. ०५ : केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) मार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी उत्तर लेखनाचा सराव असणे आवश्यक असल्याचे यवतमाळचे सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आसिया यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय सभागृहात आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. डॉ. आसिया हे युपीएससीच्या २०१६ मधील बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी विद्यार्थांना युपीएससी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा यासह मुलाखतीच्या पूर्वतयारी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते.
याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, एमपीएससी परीक्षा विषयक मार्गदर्शक व वाशिम तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार लक्ष्मण बनसोडे, समाज कल्याण विभागाचे विशेष निरीक्षक अनंत मुसळे आदी उपस्थित होते.
डॉ. आसिया म्हणाले की, यूपीएससी परीक्षेची पूर्वतयारी करताना सर्वप्रथम परीक्षेचा अभ्यासक्रम नीट समजून घ्या. तसेच मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहून परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे समजून घेऊन वाचनास सुरुवात केल्यास फायदेशीर होईल. परीक्षेच्या आवश्यकतेनुसार अभ्यासाचे नियोजन करणे आवश्यक आहे. परीक्षेत यश मिळविण्यासाठी खडतर परिश्रम व प्रचंड आत्मविश्वास आवश्यक आहे. मनावर कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास कोणत्याही स्पर्धा परीक्षेत हमखास यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तरे लिहिताना वेळेचे नियोजन असणे आवश्यक आहे. परीक्षेत प्रत्येक मिनिट महत्वाचा असतो. त्यामुळे प्रत्यक्ष परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी उत्तरे लिहिण्याचा सतत सराव असणे गरजेचे आहे. याकरिता मागील वर्षातील प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव केल्यास अधिक फायदेशीर ठरू शकेल.
परीक्षेची पूर्वतयारी करताना सकारात्मकता हवी : नायब तहसीलदार लक्ष्मण बनसोडे

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मनात कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता अतिशय सकारात्मकपणे अभ्यास करण्याची आवश्यकता असते. अनेकदा आपल्या आजूबाजूला स्पर्धा परीक्षाविषयी नकारात्मक विचार व्यक्त करणाऱ्या व्यक्ती भेटतात. तसेच आपला आत्मविश्वास कमी करणारे प्रसंगही घडतात. अशावेळी मन विचलित न होता, आपण ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी अविरत प्रयत्न करण्याची तयारी ठेवल्यास स्पर्धा परीक्षेत यश मिळविणे अतिशय सोपे असल्याचे वाशिम तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार लक्ष्मण बनसोडे यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांची पूर्वतयारी करताना काय खबरदारी घ्यावी, संदर्भासाठी कोणती पुस्तके वापरणे योग्य राहील याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी यांनी तर सूत्रसंचालन स्वरस्वती समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रा. श्रीमती संघानी यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे