वन्य प्राण्यांपासून शेतीच्या संरक्षणासाठी वन क्षेत्रालगत चर निर्मिती करा - पालकमंत्री संजय राठोड



·        जिल्हा नियोजन समिती सभेत विविध विषयांवर चर्चा
·        जिल्हा वार्षिक योजनेतील प्रत्येक काम दर्जेदार करण्याच्या सूचना
वाशिम, दि. १४ :  जिल्ह्यात वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होते. त्यामुळे वन क्षेत्रालगत खोल चर निर्मिती करून वन्य प्राण्यांना शेतामध्ये येण्यापासून रोखता येणे शक्य आहे. याकरिता वन विभागाने प्रायोगिक तत्वावर प्रत्येक तालुक्यातून एक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महसूल राज्यमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, खासदार संजय धोत्रे, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य व सर्व कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री ना. राठोड म्हणाले, वन्य प्राण्यांचा त्रास होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या वन्य प्राण्यांच्या शेतीमधील प्रवेशाला अटकाव करणे आवश्यक आहे. याकरिता खोल सलग समतल चर (डीप सीसीटी) च्या धर्तीवर खोल चर निर्मितीचे काम झाल्यास वन्य प्राण्यांना शेतीमध्ये येण्यापासून रोखण्याबरोबरच जलसंधारणाचे कामही होईल. त्यामुळे वन विभागाने याबाबतचा प्रस्ताव सादर करावा. सुरुवातील प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे प्रायोगिक तत्वावर हे काम करण्यात येईल.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना स्वतःचे ग्रामपंचायत भवन असणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःचे ग्रामपंचायत भवन नाही, त्याठिकाणी ग्रामपंचायत भवन निर्मितीसाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू. मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजने अंतरगत जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्त्यांचे काम सुरु आहे. यामधील प्रत्येक रस्त्याचे काम दर्जेदार होणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्यातील नादुरुस्त व धोकादायक पुलांची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती विशेष घटक योजना व आदिवासी विकास योजनेतून गतवर्षी विविध कार्यान्वयीन यंत्रणांना वितरीत करण्यात आलेल्या निधीच्या खर्चाचा यावेळी आढावा घेऊन या खर्चास समितीने मान्यता दिली. सन २०१७-१८ मध्ये प्राप्त झालेल्या निधी खर्चाच्या नियोजनाविषयी सुध्दा यावेळी चर्चा करण्यात आली. प्रास्ताविक व जिल्हा वार्षिक योजनेविषयी माहितीचे सादरीकरण जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी यांनी केले. विशेष घटक योजनेविषयी समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार व आदिवासी विकास योजनेविषयी आदिवासी विकास प्रकल्पच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनावणे यांनी सादरीकरण केले.
सावरगावच्या रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडवा : पालकमंत्री
मानोरा तालुक्यातील सावरगाव येथील रस्ता वन विभागाच्या परवानगी अभावी अपूर्ण आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे वन विभाग व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने याबाबत समन्वयाने प्रयत्न करून वन विभागाची आवश्यक परवानगी तातडीने मिळावी, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी दिल्या.
सर्व प्रकल्पांमध्ये पिण्यासाठी आवश्यक पाणी आरक्षित करा
यंदा आतापर्यंत पुरेसा पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील सर्वच मध्यम व लघु प्रकल्पांमधील पाणीसाठा अतिशय कमी आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, याकरिता जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये पिण्यासाठी आवश्यक पाणीसाठा आरक्षित करण्याच्या सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या. तसेच नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन यावेळी केले.

*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे