गणेशोत्सवात मातीपासून बनलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी


वाशिम, दि. १६ : गणेशोत्सव साजरा करताना यावर्षी सर्व घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये मातीपासून बनविण्यात आलेल्या कमी उंचीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज गणेशोत्सव व बकरी ईद निमित्त आयोजित शांतता समितीच्या बैठकीमध्ये केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हा परिषदचे मुख्याधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे, उपविभागीय महसूल अधिकारी राजेश पारनाईक, डॉ. शरद जावळे, अभिषेक देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस उपाधीक्षक श्री. घुगे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यांचे प्रभारी, शांतता समितीचे सदस्य व गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले की, प्लॅस्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपी पासून बनविण्यात आलेल्या जास्त उंचीच्या मुर्त्यांचे विसर्जन केल्यानंतर पीओपी पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळत नाही. अनेकदा पूर्ण न विरघळलेल्या मूर्तीचे विद्रुपीकरण होण्याची शक्यता असते. तसेच पीओपीमुळे पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. यंदा आतापर्यंत अतिशय कमी पाऊस झाल्याने शहरातील तलावांमध्ये अतिशय कमी पाणीसाठा आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास गणेशमूर्तीचे विसर्जन या तलावांमध्ये करणे शक्य होणार नाही. त्यासाठी कृत्रिम विसर्जन तलावाची निर्मिती करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी एकत्र येऊन मातीपासून बनलेल्या कमी उंचीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याबाबत निर्णय घ्यावा अथवा जास्त उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यास तिचे विसर्जन न करता केवळ छोट्या आकाराच्या स्थापना मूर्तीचे विसर्जन करून मोठी मूर्ती पुढील वर्षासाठी जपून ठेवण्याच्या पर्यायाचाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विचार करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. मातीपासून बनविलेल्या लहान मूर्तींच्या प्रतिष्ठापनेचा निर्णय झाल्यास यामाध्यमातून वाशीमचा राज्यात वेगळा आदर्श निर्माण होईल, असेही ते म्हणाले.
गणेशोत्सव व बकरी ईद साजरा करताना सर्व समाज बांधवांनी प्रशासनाला सहकार्य करावे. या दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने सजग राहण्याची गरज आहे.  नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील सर्व मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या उत्सव मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. तसेच सर्व मंडळांनी महावितरणकडून तात्पुरत्या स्वरुपात अधिकृत वीज जोडणी घ्यावी. यासाठी महावितरणने एक खिडकी योजना राबवून मंडळांना त्वरित वीज जोडणी उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी यावेळी दिल्या.
दि. २५ ऑगस्ट पासून सुरु होत असलेला गणेशोत्सव व या दरम्यान येणारी बकरी ईद शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सर्वोतोपरी सज्ज आहे. सर्व समाजातील नागरिकांनीही हे उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. गणेशोत्सव काळात डॉल्बीच्या वापरावर बंदी असून ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. उत्सव काळात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी यावेळी सांगितले. गणेशोत्सव व बकरी ईदच्या अनुषंगाने विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी, शांतता समितीचे सदस्य, मोहल्ला कमिटीचे सदस्य यांनीही यावेळी महत्वपूर्ण सूचना मांडल्या. त्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.

*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे