कृषी विकासाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना दिलासा - पालकमंत्री संजय राठोड
·
वाशिम येथे
स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य प्रशासकीय ध्वजारोहण
·
टोकन वाटप केलेल्या शेतकऱ्यांची
तूर ३१ ऑगस्टपर्यंत खरेदी करणार
·
नागपूर-मुंबई कृषी समृद्धी
महामार्गामुळे जिल्ह्याचा विकासाला गती मिळणार
वाशिम, दि. १५ : शेती व शेतकरी यांच्या
विकासावर शासनाचा विशेष भर आहे. जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे,
गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना यासारख्या जलसंधारण
व कृषी विकासाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांना दिलासा
मिळाला असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड
यांनी केले. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वातंत्र्य
दिनानिमित्त आयोजित मुख्य प्रशासकीय ध्वजारोहण प्रसंगी ते बोलत होते. सर्वप्रथम पालकमंत्री
ना. राठोड यांच्या ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित लोकप्रतिनिधी,
स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, अधिकारी, कर्मचारी व नागरीक यांना पालकमंत्र्यांनी
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी
जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, आमदार राजेंद्र पाटणी, वाशिमचे नगराध्यक्ष
अशोक हेडा, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश
हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी,
उपविभागीय अधिकारी अभिषेक देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता
के. आर. गाडेकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री
ना. राठोड म्हणाले की, राज्य शासनाच्या जलयुक्त
शिवार अभियानातून सन २०१५-१६ व सन २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात ३४९ गावात ६ हजार ८७८ कामे
पूर्ण झाली आहेत. तसेच २०१७-१८ मध्ये आतापर्यंत १२० गावांत ६०३ कामे झाली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असून या काळात जलयुक्त शिवार
अभियानाच्या कामांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मागेल त्याला शेततळे,
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या
माध्यमातूनही जिल्ह्यात चांगले काम होत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी
शासन प्रयत्नशील आहे. याकरिता शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला आहे. जिल्ह्यात
३१ मे पर्यंत टोकन वाटप केलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचा निर्णयही
शासनाने घेतला आहे. त्यानुसार २६ जुलै पासून जिल्ह्यात १ लाख ७ हजार क्विंटल
तुरीची खरेदी झाली आहे. उर्वरित सर्व शेतकऱ्यांची तूर ३१ ऑगस्ट पूर्वी खरेदी करण्यासाठी
नियोजन करण्यात आले असून याकरिता शासकीय सुट्टीच्या दिवशीही तूर खरेदी सुरु
ठेवण्यात आली आहे.
स्वच्छ भारत अभियानातून जिल्ह्यात
चांगले काम झाले आहे. ग्रामीण भागात २०१७-१८ मध्ये आतापर्यंत ६ हजार ७०० वैयक्तिक
शौचालये बांधली गेली आहेत. तसेच नागरी भागात गेल्या दीड वर्षांमध्ये १० हजार ७२६
वैयक्तिक शौचालयांची उभारणी झाली असून जिल्ह्यातील चारही नगरपालिका हागणदारीमुक्त
घोषित झाल्या आहेत. याबाबत केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या क्यू. सी. आय.
संस्थेनेही प्रमाणपत्र दिले आहे. दि. ३१ ऑगस्ट पर्यंत मालेगाव व मानोरा नगरपंचायती
सुध्दा हागणदारीमुक्त होतील. राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण अंतर्गत राज्यात सातबारा
री-एडिटिंगचे काम सुरु आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४०३ गावांचे
री-एडिटिंगचे काम पूर्ण झाले आहे. या कामात वाशिम जिल्हा राज्यात आघाडीवर आहे, ही जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत जिल्ह्याला ५ लाख ८ हजार वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट होतं. या मोहिमेत जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करीत ६ लाख ५१ हजार वृक्षांची लागवड केली असल्याचे पालकमंत्री ना. राठोड यावेळी म्हणाले.
री-एडिटिंगचे काम पूर्ण झाले आहे. या कामात वाशिम जिल्हा राज्यात आघाडीवर आहे, ही जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत जिल्ह्याला ५ लाख ८ हजार वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट होतं. या मोहिमेत जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करीत ६ लाख ५१ हजार वृक्षांची लागवड केली असल्याचे पालकमंत्री ना. राठोड यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री
विशेष सहाय्य निधीतून जिल्हाधिकाऱ्यांना २ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. या
निधीतून कारंजा तालुक्यातील भामदेवी गावाचा सर्वांगीण विकास केला जात आहे. या
गावात सलग समतल चर, शेततळी, शेडनेटचे काम झाले असून शेतीपूरक व्यवसाय निर्मितीसाठी
१७० दुधाळ म्हशी, १३० शेळी व १३ बोकडाचे वाटप करण्यात आले आहे. या गावात
दुग्धविकास सहकारी संस्थेच्या माध्यमातून १००० लिटर क्षमतेचे मिल्क प्रोसेसिंग
युनिट उभारले असून त्याद्वारे ‘वऱ्हाड दुध’ नावाने दुग्ध पदार्थांची निर्मिती केली
जात आहे. त्याच्या विक्रीसाठी कारंजा शहरात विक्री केंद्र सुध्दा सुरु झाले
असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री
म्हणाले की, नागपूर ते मुंबई दरम्यान महाराष्ट्र कृषी समृद्धी महामार्ग प्रस्तावित
आहे. या मार्गाचा सुमारे १०० किलोमीटरचा टप्पा वाशिम जिल्ह्यातून जाणार आहे.
दळणवळण सुविधा निर्मितीसाठी हा मार्ग उपयुक्त ठरेल. या मार्गामुळं वाशिम ते मुंबई
अंतर ४ तासात पार करता येईल. त्यामुळं जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल. सार्वजनिक
बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते थेट खरेदीनं या मार्गाच्या भूसंपादनास
सुरुवात झाली आहे. भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना पाचपट मोबदला दिला जात आहे.
पालकमंत्री
ना. राठोड म्हणाले की, पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांच्या
आराखड्याला शासनाच्या उच्च स्तरीय समितीनं मान्यता दिली आहे. याठिकाणी बंजारा
संस्कृतीचे दर्शन घडविणारे संग्रहालय, खुले सभागृह यासह इतर पायाभूत सुविधांची
निर्मिती केली जाणार आहे. नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम राबविला जात आहे. याद्वारे जिल्ह्यातील १०
योजनांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकतेच ई-भूमिपूजन झाले आहे. जिल्ह्यातील
खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी
जिल्हा क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे २ सिंथेटिक लॉन टेनिस कोर्ट,
बास्केटबॉल कोर्ट तयार करण्यात आले आहेत. तसेच याठिकाणी जलतरण तलावाचे कामही
प्रगतीपथावर आहे.
वाशिम
येथे अॅडव्हेंचर्स पार्क व तारांगण निर्मितीचं काम अंतिम टप्प्यात आहे. राज्यात
प्रथमच शासकीय उपक्रम म्हणून तारांगण निर्मिती होत आहे. वाशिम शहरातील टेम्पल
गार्डनचा विकास, जिल्हा क्रीडा संकुल येथे जलतरण तलावाची निर्मिती, विस्तारित
विश्रामगृह इमारत, जिल्हा कोषागार कार्यालय, न. प. प्रशासकीय इमारत, जिल्हा
ग्रंथालय इमारत, जिल्हा नियोजन भवन आदी इमारतींचे कामेही लवकरच पूर्ण होतील, असे
पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
वृक्ष
लागवड मोहीम, स्वच्छ भारत अभियान, संत तुकाराम वनग्राम योजना अंतर्गत उत्कृष्ट
कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती व वन व्यवस्थापन समितींचा यावेळी पालकमंत्री ना.
राठोड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच प्रजासत्ताक दिनी
मानवी साखळीतून स्वच्छ भारत अभियानाचा लोगो तयार करून जागतिक विक्रम स्थापित
करण्यामध्ये सहभागी झालेल्या शाळांना यावेळी प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
शासकीय सेवेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी
यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन शिरसाट यांनी
केले.
Comments
Post a Comment