उत्पादन खर्च कमी करण्यासाठी गट शेती उत्तम पर्याय - अभिजीत देवगिरीकर




·         केकतउमरा येथे ‘संवाद पर्व’ कार्यक्रमात नागरिकांशी संवाद
·         शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन विकास साधण्याचे आवाहन
वाशिम, दि. २९ : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीमधील उत्पादन खर्च कमी होणे आवश्यक आहे. यासाठी राज्य शासनाने गट शेतीला प्रोत्साहन देण्याचे निश्चित केले असून गट शेती हा उत्पादन खर्चात बचतीचा उत्तम पर्याय आहे, असे मत वाशिमचे तालुका कृषी अधिकारी अभिजीत देवगिरीकर यांनी व्यक्त केले. केकतउमरा येथे शिवभक्त गणेशोत्सव मंडळाच्या सहकार्याने व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने सोमवारी आयोजित ‘संवाद पर्व’ कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप, दिलीप काळे उपस्थित होते.
श्री. देवगिरीकर म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी शासनाने कृषी विषयक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुरु केली आहे. यासाठीच ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अभियान राज्यात राबविले जात आहे. या माध्यमातून ट्रॅक्टर, विविध स्वयंचलित अवजारे, सिंचन साधने यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. राज्यात गट शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सुध्दा शासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. लहान-लहान जमिनीच्या तुकड्यांमुळे शेतीमध्ये उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे समूहाने शेती केल्यास या खर्चात बचत होऊ शकते. सामूहिकरित्या शेतमालाचे उत्पादन व विक्री केल्याने उत्पादन व वाहतूक खर्चात बचत होऊन फायदा होईल.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे यांनीही यावेळी नैसर्गिक आपत्तीचा सामना कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, दुष्काळ, पूर, वीज कोसळणे यासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये नागरिकांनी सजग राहणे आवश्यक आहे. अशा आपत्ती येऊ नये, यासाठी आपण काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच एखादी आपत्ती ओढवली तर तिची तीव्रता कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. अशा प्रसंगी काय उपाययोजना कराव्यात, याबाबत श्री. बोराडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक करताना श्री. घोलप म्हणाले की, शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी, यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने गणेशोत्सव काळात ‘संवाद पर्व’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. विविध विभागांचे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या विभागाशी संबंधित योजनांची माहिती नागरिकांना देणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश पसारकर यांनी केले. शिवभक्त गणेशोत्सव मंडळाचे सुनील बोरगावकर, परेश व्यवहारे, प्रवीण पट्टेबहाद्दूर, गजानन घोडे व इतर सदस्यांनी कार्यक्रम आयोजनासाठी सहकार्य केले.
‘मी मुख्यमंत्री बोलतोय...’ पुस्तिकेचे वितरण

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणारा ‘मी मुख्यमंत्री बोलतोय...’ हा संवादात्मक कार्यक्रम दूरदर्शनसह अन्य खाजगी वाहिन्यांवरून प्रसारित होतो. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी साधलेल्या संवादावर आधारित पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. ही पुस्तिका केकतउमरा येथील ‘संवाद पर्व’ कार्यक्रमाला उपस्थित शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे