जनसामान्य नागरिकांपर्यंत 'सेवा' पोहचविण्यासाठी सर्वांनी मिळून चांगले कार्य करूया पालकमंत्री ना. दत्तात्रय भरण ेछत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवड्याचा उत्साहात शुभारंभ
पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवड्याचा उत्साहात शुभारंभ
वाशिम,(जिमाका)
सेवा पंधरवडा दरम्यान आपल्या जिल्ह्याला अधिक सुसज्ज व सेवाभिमूख बनवूया. शासनाच्या सेवा जनसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी आपण सर्वजण मिळून चांगले कामकाज करूया.असे प्रतिपादन कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या सेवा पंधरवड्याचा शुभारंभ आज दि.१७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन सभागृहात झाला.यावेळी पालकमंत्री ना.श्री भरणे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला.
यावेळी व्यासपीठावर विधानपरिषद सदस्य आ.किरणराव सरनाईक, विधानसभा सदस्य आ.सईताई डाहाके (दूरदृष्यप्रणालीव्दारे), जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिल्पा सानप आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सेवा पंधरवडामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान होणार असल्याचे सांगितले.पालकमंत्री ना. श्री.भरणे म्हणाले, सेवा पंधरवडामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ वाटप व सेवा द्याव्यात.शासनाच्या सेवा जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे हेच आपले उद्दिष्ट असावे. यावेळी त्यांनी शुभारंभाच्या शुभेच्छा दिल्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले, सामान्य नागरिकांची गरज ओळखून या अभियानाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण होत आहे. ही निश्चितच चांगली बाब आहे. यावेळी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
आ.किरणराव सरनाईक म्हणाले, देशाचे प्रधानमंत्री विकासाचा ध्यास समोर ठेवून काम करीत आहेत.गोरगरीब जनतेला केंद्र, राज्यशासनाच्या योजना कश्या मिळतील यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. आज आपण बघितलं तर मागील काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांसाठी जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पांदन रस्त्यांची दुरवस्था झाली दिसून येते. या सेवा पंधरवडामध्ये पांदन रस्त्यांच्या समस्या निश्चितपणे दूर होतील यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत आकांक्षित जिल्ह्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात याव्यात असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर म्हणाले, महसूल विभागाच्या वतीने महाराजस्व अभियान राबविले जाते. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी वर्गाचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे प्रमाणपत्र होय.एक महत्वाचा विषय म्हणजे पांदन रस्ते. गावपातळीवरचे काही रस्ते नकाशावर नोंद असतात तर काही नसतात.परिणामी काही वेळेला यामुळे वाद निर्माण होतात. हे वाद टाळण्यासाठी शेतरस्ता,पांदणरस्त्यांची नोंद शासनस्तरावर होण्यासाठी ह्या सेवा पंधरवडामध्ये विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. गावपातळीवर ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे. या ग्रामसभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक तालुक्यातील दूर अंतरावरील गावे आयडेंटीफाय करून गावभेटी देण्यात येणार आहे. गाव भेटीदरम्यान गावपातळीवरील समस्या सोडविण्यासाठी आदी सेतू जनसंवाद उपक्रम राबविण्यात येणार आहे.सर्व नियोजनबध्द कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ते पुढे म्हणाले, शेतकरी संवादातून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न या माध्यमातून होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. महास्वामित्व योजनेच्या माध्यमातून सर्व गावठाणांचे ड्रोणद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्या सर्वेक्षणातून गावातील मिळकतीच्या मालकी हक्काच्या सनद वाटपाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले. सेवा पंधरवडामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ घ्यावा.या अभियानाला सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यावेळी केले.
ते पुढे म्हणाले, २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील ५० गावांत सनद वाटपाचे शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.तरी नागरिकांनी सनद फी भरणा करून मिळकतीच्या मालकी हक्काची सनद प्राप्त करून घ्यावी.
या दरम्यान संजय गांधी योजना, पुरवठा विभाग, आधार कार्ड, उत्पन्न दाखला,नॉन क्रीमीलेअर, वय व आदिवास प्रमाणपत्र, स्वामित्व सनद, घरकुल नियमानुकुल पट्टे वाटप,जात प्रमाणपत्र, सातबारा फेरफार, भूसंपादन मोबदला वाटपाचे प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
प्रास्ताविक ब्रिजेश पाटील यांनी केले. त्यांनी सेवा पंधरवडामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन अर्चना घोळवे, शाहू भगत यांनी केले. उपस्थितांचे आभार उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव यांनी मानले.
Comments
Post a Comment