सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची मौजे बिटोडा येथे ग्रामसभेला भेट
सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची मौजे बिटोडा येथे ग्रामसभेला भेट
वाशिम, (जिमाका):
सेवा पंधरवडा कार्यक्रमाच्या निमित्ताने दिनांक 17 सप्टेंबर रोजी मौजे बिटोडा (ता. मंगरुळपीर) येथे जिल्हा परिषद शाळेत आयोजित ग्रामसभेस जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी भेट दिली.
ग्रामसभेचे संचालन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अविनाश ठाकुर यांनी केले. सभेस मंगरुळपीरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, प्रभारी तहसीलदार रवी राठोड, आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे गजानन कव्हळकर, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेविका, आरोग्य सेविका, आशा सेविका, कृषीसेवक यांच्यासह ग्रामस्तरीय सर्व कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
सभेमध्ये मौजे बिटोडा येथील प्रपत्र क्र. 1 व 2 मधील पांदन रस्ते, शिवरस्ते व गाडी रस्ते यांचे वाचन करून चर्चा करण्यात आली व सदर रस्त्यांना मान्यता देण्यात आली.
ग्रामस्थांसोबत संवाद साधताना जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत इमारत, तलाठी कार्यालय, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची नियुक्ती तसेच महिला शिक्षिकेची मागणी आदी विषयांवर चर्चा केली. त्यांनी ग्रामस्थांच्या मागण्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून निकाली काढण्याचे निर्देश दिले.
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रावण बाळ योजना व संजय गांधी योजना लाभार्थ्यांना मंजुरी पत्र प्रदान करण्यात आले. तसेच जिवंत 7/12 मोहिमेचा शुभारंभ मौजे बिटोडा भोयर येथील गंगाराम भोयर यांच्या वारस नोंदीसह करण्यात आला. उत्पन्न दाखलेही प्रतिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.
ग्रामसभेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेस भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षकवृंदांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांचे आभार मानले.
Comments
Post a Comment