मुंगळा येथील अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला

 

वाशिम, दि. ३१ : महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे ३० डिसेंबर २०२० रोजी मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात आला. या बालविवाहाबाबतची माहिती वाशिम चाईल्ड लाईनकडून प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या समुपदेशनाने सदर बालविवाह रोखला.

बालविवाहाबाबतची माहिती वाशिम चाईल्ड लाईनकडून मिळाल्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संरक्षण अधिकारी कु. लक्ष्मी एस. काळे, कायदा तथा परीविक्षा अधिकारी जिनसाजी चौधरी, सामाजिक कार्यकर्ता रमेश वाघ, अनंता इंगळे, क्षेत्रीय कार्यकर्ता एकनाथ राठोड, तसेच चाईल्ड लाईनचे समन्वयक महेश राऊत, शुभांगी नागलकर, मालेगाव तालुका संरक्षण अधिकारी महादेव जऊळकर यांच्याशी संपर्क करून बालविवाह रोखण्याचे आदेश दिले.

सदर पथकाने मालेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल समाधान मोघाड, मंगेश गोपनारायण, मुंगळा गावचे पोलीस पाटील श्री. पाटील, आशा सेविका सुरेखा केळे तसेच ग्रामसेवक किसन चौधरी, ग्रामपंचायत लिपिक संजय नखाते यांच्या मदतीने अल्पवयीन मुलीचे वडील व कुटुंबियांचे समुपदेशन करून बालविवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत हमीपत्र लिहून घेतले. यावेळी उपस्थितांमध्ये कोरोना आजरा संबंधी काळजी घेवून कार्यवाही करण्यात आली. जिल्ह्यात अशाप्रकारे बालविवाह होत असल्यास चाईल्ड लाईनच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. राठोड यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे