जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजना निधी खर्च नियोजनाचा आढावा

·        प्रशासकीय मान्यतेचे सर्व प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना

वाशिम, दि. १० (जिमाका) : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधरण) २०२०-२१ मधील निधी खर्च नियोजनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली आज, १० डिसेंबर रोजी नियोजन भवन येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. राज्य शासनाने ८ डिसेंबर २०२० रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार सर्व अंमलबजावणी यंत्रणांनी प्रशासकीय मान्यता आणि निधी मागणीसाठी परिपूर्ण प्रस्ताव १५ डिसेंबर २०२० पर्यंत जिल्हा नियोजन कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, उप वनसंरक्षक सुमंत सोळंके, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांच्यासह विविध अंमलबजावणी यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, नियोजन विभागाच्या ८ डिसेंबर रोजीच्या निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेतून करावयाच्या निधी वितरणावरील बंधने शिथिल करण्यात आली आहेत. त्यानुसार सर्व प्रशासकीय यंत्रणांनी त्यांना जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर असलेल्या विहित नियतव्ययानुसार प्रस्तावित कामांसाठी प्रशासकीय मान्यता व निधी वितरणासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. सदर निधी ३१ मार्च २०२१ पूर्वी खर्च होणे आवश्यक असल्याने त्यादृष्टीने सूक्ष्म नियोजन करून निधी मागणी करावी. ऐनवेळी निधी परत करण्याची वेळ येणार नाही, याची दक्षता घ्यावी. ग्रामीण रस्ते, लघुसिंचन प्रकल्प दुरुस्ती व बळकटीकरण, आरोग्य सुविधांचे बळकटीकरण आदी बाबींना जिल्हा वार्षिक योजनेतून भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला असून तो संपूर्ण निधी विहित कालावधीत खर्च करावा. तसेच सर्व यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या सन २०२१-२२ च्या प्रारूप आराखड्यासाठी प्रस्तावही १५ डिसेंबर पर्यंत सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे