‘रोहयो’च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करा - नंदकुमार
· रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा
वाशिम, दि. ०८ : जिल्ह्याचा विकास होण्यासाठी कृषि क्षेत्राचा विकास होवून
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणे आवश्यक आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून
शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना मृद व जलसंधारण, रोजगार
हमी योजना विभागाचे प्रधान सचिव तथा वाशिम जिल्ह्याचे पालक सचिव नंदकुमार यांनी
दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आज, ८ डिसेंबर रोजी
झालेल्या रोजगार हमी योजना आढावा बैठकीत ते
बोलत होते.
यावेळी
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश
मोहिते, सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील
रोहयो उपायुक्त धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो)
शैलेश हिंगे यांच्यासह विविध अंमलबजावणी यंत्रणांचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी
उपस्थित होते.
श्री.
नंदकुमार म्हणाले, रोजगार हमी योजनेसाठी निधीची पुरेशी उपलब्धता आहे. मात्र,
स्थानिक परिस्थिती लक्षात घेवून योग्य कामांची निवड, काम पूर्ण करण्याचे सूक्ष्म
नियोजन, कामाची गुणवत्ता या बाबींना विशेष महत्व आहे. वाशिम जिल्हा हा आकांक्षित
जिल्हा आहे, या जिल्ह्याचा विकास होण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणे आवश्यक
आहे. याकरिता रोजगार हमी योजनेतून विविध कामांची मदत होवू शकते. राज्यात अनेक
गावांमध्ये रोजगार हमी योजनेच्या कामांमुळे शेतीतील उत्पन्न वाढल्याची उदाहरणे
आहेत. त्याचा अभ्यास करून आपल्या जिल्ह्यात कोणती कामे करता येणे शक्य आहे, याबाबत
सर्व अंमलबजावणी यंत्रणांनी नियोजन करावे. लोकांना या कामाचे फायदे समजवून
सांगावेत व जिल्ह्यात जास्तीत जास्त कामे करून शेतीतील उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न
करावेत, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी
षण्मुगराजन एस. म्हणाले, रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारी,
गावाच्या विकासाला हातभार लावणारी कामे करण्याला प्राधान्य द्यावे. याकरिता नागरिकांमध्ये
जनजागृती करावी. जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये या योजनेतून परिणामकारक काम होईल,
यासाठी सर्व जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत.
श्री. हिंगे यांनी प्रास्ताविकातून रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेली कामे, पूरक आराखड्यात समाविष्ट कामे, मजुरांची आधार नोंदणी, जॉबकार्ड पडताळणीची माहिती दिली. अमरावती येथील शाम मकरंदपुरे, मास्टर ट्रेनर निलेश घुगे, कारंजाचे तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment