थकबाकीदार शेतकऱ्यांनी पिक कर्ज पुनर्गठण योजनेचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा


·        पुनर्गठण केल्यानंतर लगेच मिळणार नवीन पिक कर्ज
·        पुनर्गठण, पिक कर्ज वाटपाची प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना
वाशिम, दि. ०३ : शेतकऱ्यांनी सन २०१७-१८ मध्ये घेतलेल्या व अद्याप भरणा ने केलेल्या पिक कर्जाचे पुनर्गठण करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार कर्जाचे पुनर्गठण करणाऱ्या शेतकऱ्यांना लगेच नवीन पिक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पिक कर्ज पुनर्गठण करण्यासाठी आवश्यक संमतीपत्र तातडीने संबंधित बँक शाखेत अथवा सेवा संस्थेच्या सचिवाकडे जमा करून पिक कर्ज पुनर्गठण योजना व नवीन पिक कर्जाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.
नियोजन भवन येथे आज झालेल्या सर्व बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. मिश्रा म्हणाले, सन २०१७-१८ मध्ये घेण्यात आलेले २४ हजार ४४७ शेतकऱ्यांचे सुमारे २१२ कोटी रुपये पिक कर्ज शासन निर्णयानुसार पुनर्गठणासाठी पात्र आहे. त्यामुळे या सर्व शेतकरी बांधवांनी तातडीने संबंधित बँक शाखेत अथवा सेवा संस्थेच्या सचिवाकडे पुनर्गठणासाठी आवश्यक असलेले संमतीपत्र भरून द्यावे. असे संमतीपत्र देणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना तातडीने सन २०१८-१९ साठीचे पिक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार सर्व बँकांनी पिक कर्ज पुनर्गठणाची कार्यवाही तातडीने करावी. तसेच संबंधित शेतकऱ्याला तातडीने नवीन पिक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
यापूर्वी पुनर्गठण झालेले पिक कर्ज कर्जमाफी योजनेत माफ
सन २०१३-१४, २०१४-१५ व सन २०१५-१६ या वर्षात शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिक कर्जाचे वेळोवेळी पुनर्गठण करण्यात आले होते. पुनर्गठण करण्यात आलेले हे कर्ज सुध्दा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत माफ करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी सुध्दा बँकेशी संपर्क साधून नवीन पिक कर्ज उपलब्ध करून घ्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे