बोंडअळीच्या नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करा - पालकमंत्री संजय राठोड


• जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक
• जिल्ह्यातील कोल्हापूर पध्दतीचे सर्व बंधारे दुरुस्त करण्याच्या सूचना
• शासकीय रुग्णालयांमधील सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश
• जिल्ह्यातील सर्व व्यायामशाळांची होणार तपासणी

वाशिम, दि. १४ : गतवर्षी कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यावर्षी सुध्दा बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे बोंडअळीवर नियंत्रण आणण्यासाठी कृषि विभागाने तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी आज दिल्या.

नियोजन भवन सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, अंमलबजावणी यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, कापसावरील बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी करावयाच्या उपयायोजनांची माहिती कृषि विभागाने शेतकऱ्यांपर्यंत तातडीने पोहोचावी. कृषि विभागाच्या क्षेत्रस्तरीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना आवश्यक मार्गदर्शन करावे. तसेच आतापर्यंत बोंडअळीच्या प्रादुर्भावाने झालेल्या नुकसानीची माहिती संकलित करून शासनाला सादर करावी. जेणेकरून शेतकऱ्यांचे भविष्यात होणारे नुकसान कमी करता येईल.

खरीप हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याच्या सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या होत्या. मात्र तरीही अनेक बँकांनी अतिशय कमी प्रमाणात कर्ज वाटप केले आहे. अशा बँकांमधील विविध शासकीय योजनांच्या ठेवी काढून घेऊन अधिक पिक कर्ज वाटप केलेल्या बँकेत ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. राठोड यांनी यावेळी दिल्या. तसेच जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पॉलिहाऊस केली आहे, मात्र काही कंपन्यांनी पॉलिहाऊसचे काम नित्कृष्ट दर्जाचे करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. अशा कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

सिंचनाची सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न करताना जिल्ह्यात अस्तित्वात असलेले कोल्हापूर पद्धतीचे सर्व बंधारे दुरुस्त करण्यास प्राधान्य द्यावे. या बंधाऱ्याची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरच नवीन बंधाऱ्यांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जाईल. दुरुस्त झालेले बंधाऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी आजूबाजूच्या शेतकऱ्यांची पाणीवाटप संस्था स्थापन करून त्यांच्यावर बंधाऱ्याच्या देखभालीची जबाबदारी सोपविण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. राठोड यांनी यावेळी दिल्या. जिल्हा वार्षिक योजनेतून अनुदान देण्यात आलेल्या अनेक व्यायामशाळा सध्या बंद आहेत. त्याचा इतर कारणांसाठी वापर होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे २००८ पासून अनुदान वाटप करण्यात आलेल्या व्यायामशाळांची तपासणी करून त्यांच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील ड्रेनेजची दुरवस्था झाल्याने दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. ड्रेनेजच्या कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाईल. हे काम तातडीने पूर्ण करावे. तसेच महिला रुग्णालय व कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

खासदार गवळी यांनी जिल्ह्यातील प्रलंबित वीज उपकेंद्रांची कामे त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली. आमदार पाटणी यांनी जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सुरु असलेल्या विहिरींच्या कामांना गती देण्याच्या सूचना केल्या. तसेच दुग्ध विकास विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली. आमदार मलिक, आमदार झनक यांनीही यावेळी विविध प्रश्न उपस्थित करून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.

प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी यावेळी मागील सभेचे इतिवृत्त, सन २०१७-१८ मधील खर्चाचा अहवाल व सन २०१८-१९ मध्ये झालेल्या खर्चाच्या माहितीचे सादारीकरण केले. यावेळी जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी विकास उपयोजना यांचा आढावा घेण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे