शंकरच्या पिढीजात व्यवसायाला मुद्राचा आधार






शंकर खोडके... व्यवसाय केस कर्तन. पिढीजात व्यवसाय करणारे आज आपल्या व्यवसायापासून दूर जात असताना शंकरने आपला हा व्यवसाय ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता सुरूच ठेवला तो वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर या आपल्या गावापासून ४ किलोमीटर अंतर असलेल्या तांदळी या गावात. कधी पायीपायी तर कधी सायकलने दररोज व्यवसायासाठी तांदळी गाठावी लागायची. घरी ३ मुले मोठे होत असताना त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न शंकरला पडायचा. कुठे तरी आपण स्थिर होवून हा व्यवसाय केला पाहिजे असा विचार डोक्यात येत असायचा. एकदा शंकर गावातील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत गेला असता प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेची माहिती बँकेचे व्यवस्थापक श्री. अर्जुन राऊत यांनी दिली.

प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना ही गरजू आणि बेरोजगार व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी असल्यामुळे आता या योजनेतून आपण कर्ज घेवून पार्डी टकमोर या आपल्या गावातच आपला पिढीजात केस कर्तनाचा व्यवसाय सुरु करून व्यवसायासाठी तांदळीत होणारी पायपीट थांबविण्याचा निर्णय शंकरने घेतला. वडिलोपार्जित हा व्यवसाय असल्यामुळे वडिलांना २५ वर्षांपासून शंकर या व्यवसायात मदत करायचा. लग्न झाल्यानंतर तीन मुले झाली. पुढे ही मुले मोठी होवून शिक्षण घेवू लागली. शिक्षणासाठी पैसा खर्च होवू लागला. तांदळीला दिवसाचे १०० ते १५० रुपये कमाई व्हायची. पण आजच्या महागाईच्या काळात तर हा पैसा नगण्यच असल्यामुळे प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतून गावातच एक नवीन केस कर्तनालय सुरु करण्यासाठी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेने शिशु गटातून सप्टेंबर २०१७ मध्ये २५ हजार रुपये कर्ज उपलब्ध करून दिले. यामधून ग्रामपंचायतीजवळ असलेल्या सरकारी जागेवर केस कर्तनालयाचे दुकान तयार करण्यासाठी फर्निचर, खुर्च्या, आरसे, कैच्या, दाढी व कटिंगसाठी लागणारे साहित्य, पावडर, टॉवेल व अन्य साहित्य खरेदी केले. केस कर्तनाचा पिढीजात व्यवसाय गावात सुरु करण्यासाठी मुद्रा योजनेचा शंकरला आधार झाला. गावातील ग्राहक दाढी, कटिंग करण्यासाठी तर येतातच शेजारच्या तांदळी, बिटोडा, जांभरुण, पांडव उमरा, जुनोना येथील ग्राहक सुध्दा येतात. दर शुक्रवारी गावात आठवडी बाजार भरत असल्यामुळे ग्राहकांची दुकानात गर्दी असते. कटिंगसाठी २५ रुपये तर दाढीसाठी १५ रुपये एका ग्राहकांकडून घेण्यात येतात. दररोज ३५० ते ४०० रुपये नफा या व्यवसायातून मिळत आहे. केस कर्तनाचा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतून घेतलेल्या कर्जाची परतफेड शंकर नियमितपणे करीत आहे.

शंकर खोडकेला तीन मुले असून मोठा मुलगा किसनने वाशिम येथून समाजकार्य पदवीचे शिक्षण घेतले आहे. आता तो वाशिम येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. बळीराम बारावी उत्तीर्ण झाला असून ज्ञानेश्वर ११ वीचे शिक्षण गावातील कनिष्ठ महाविद्यालयात घेत आहे. बळीराम आणि ज्ञानेश्वर ही दोन्ही मुले शंकरला व्यवसायात हातभार लावीत आहेत. मुद्रा योजनेतून मिळालेल्या कर्जामुळे शंकरच्या पिढीजात केस कर्तनाच्या व्यवसायाला आधार मिळाला असून शंकरची आर्थिक व सामाजिक परिस्थिती बदलण्यास ही योजना उपयुक्त ठरली आहे. आता हा व्यवसाय मोठ्या स्वरुपात वाशिम येथे सुरु करण्याचा विचार शंकरने व्यक्त केला आहे.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे