समाज माध्यमांतील माहितीची सत्यता पडताळणे आवश्यक - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा







·        ‘फेक न्यूज : परिणाम व दक्षता’ विषयावर मार्गदर्शन
वाशिम, दि. ०१ : समाज माध्यमांचा वापर आज मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या माध्यमांतून देण्यात येणाऱ्या माहितीचा प्रसार गतीने होऊन त्यावर तत्काळ प्रतिक्रिया उमटतात. अनेकदा चुकीची माहिती पुढे पाठविल्यामुळे विपरीत घटना घडून सामाजिक वातावरण बिघडू शकते. त्यामुळे समाज माध्यमांचा वापर करतांना प्रत्येकाने या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या माहितीची पडताळणी करूनच ती माहिती पुढे पाठविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी १ ऑगस्ट रोजी नवीन पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधीक्षक सपना गोरे, महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. मिश्रा म्हणाले, समाज माध्यम हे दुधारी शस्त्रासारखे आहे. त्याचा सदुपयोगही करता येतो आणि दुरुपयोग सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे या माध्यमाच्या प्रत्येक वापरकर्त्यामध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. समाज माध्यमांचा वापर करतांना काय खबरदारी घेणे आवश्यक आहे, चुकीची माहिती पुढे पाठविली तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात, माहितीची पडताळणी कशी केली पाहिजे, याबाबत प्रत्येक वापरकर्त्याला मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. यामध्ये मुद्रित माध्यमे व इलेक्ट्रॉनिक माध्यमांची भूमिका महत्वाची आहे. या दोन्ही माध्यमांवर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे फेक न्यूजसारखे प्रकार रोखण्यासाठी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे व या माध्यमांच्या प्रतिनिधींनी पुढाकार घेऊन समाज जागृती करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील म्हणाल्या, समाज मध्यामांमधून सातत्याने दिल्या जाणाऱ्या एकसारख्या माहितीमुळे लोकांची मानसिकताही त्याचप्रमाणे बनते. त्यामुळे मुले चोरणारी टोळीसारख्या अफवांचा समाज माध्यमांमधून झालेल्या चुकीच्या प्रसारामुळे घडलेल्या काही घटनांमध्ये निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या माध्यमांमधून कोणताही संदेश पुढे पाठवितांना त्या माहितीची सत्यता पडताळून पाहणे ही प्रत्येक वापरकर्त्याची जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव प्रत्येकाने ठेवली तर फेक न्यूजसारख्या प्रकारांमुळे जाणारे बळी थांबतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलतांना महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे म्हणाले, माहिती पुढे पाठविण्याच्या स्पर्धेतून आपण नकळत चुकीचा संदेश फोरवर्ड करतो. मात्र आपल्या या चुकीमुळे समाजाचे, व्यक्तींचे नुकसान होण्याची शक्यता असते. अशाच प्रकारच्या चुकीच्या माहितीतून जमावाने निष्पाप लोकांचे बळी घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. कोणत्याही माध्यमातून मिळणाऱ्या माहितीची सत्यता पडताळणीसाठी प्रत्येकाने त्या माहितीचा स्त्रोत, त्यामागील हेतू, त्याचा लेखक कोण आहे, हे पहिले पाहिजे. तसेच त्या माहितीचे इतर स्रोत सुध्दा तपासून माहितीची पडताळणी केली पाहिजे. सदर माहिती देण्यामागे संबंधिताचा नक्की हेतू काय असू शकतो, याचा सारासार विचार करून त्याच्या सत्यतेविषयी खात्री झाल्यानंतरच ती माहिती पुढे पाठवावी अथवा प्रसिद्ध करावी.
जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे म्हणाले, प्रसारमाध्यमे ही समाजात महत्वाची भूमिका बजावतात. विज्ञान ते आध्यात्मिक विषयातील सत्य माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमे करतात. समाज माध्यमातून फेक न्यूजच्या प्रसार होत असल्याने सामाजिक शांतता धोक्यात आली आहे. फेक न्यूजच्या बाबतीत मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमे दक्ष असून फेक न्यूजचे प्रकार रोखण्यासाठी सुध्दा ही माध्यमे पुढाकार घेतील, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे म्हणाले, फेक न्यूजमुळे समाजामध्ये दहशतीचे वातावरण तयार होऊन अघटीत घटना घडत आहेत. हे प्रकार टाळण्यासाठी समाज प्रबोधन होणे आवश्यक आहे. मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा समाजावर प्रभाव असून या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती घडविण्यासाठी प्रसारमाध्यम प्रतिनिधींची मदत व्हावी व जास्तीत जास्त लोकांपर्यंत फेक न्यूज विषयी माहिती पोहोचावी, यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माहिती सहाय्यक तानाजी घोलप, राखीव पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे, प्रदीप डाखोरे, दीपक घुगे, जिल्हा माहिती कार्यालयाचे दिलीप काळे, राजू जाधव, विजय राठोड, विश्वनाथ मेरकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुशील भीमजियाणी यांनी मानले.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे