कृषि विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न - पालकमंत्री संजय राठोड
· प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे ध्वजारोहण
·
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पात
१४९ गावांचा समावेश
·
ग्रामीण, शहरी भागातील पाणी टंचाई
निवारणार्थ कृती आराखडा तयार
वाशिम, दि. २६ : शेतीला संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासह कृषि व कृषिपूरक उद्योगांच्या
विकासाला गती देण्यासाठी शासन विविध योजना राबवीत आहे. या योजनांची जिल्ह्यात
प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे
प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी
केले. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य
ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. सर्वप्रथम पालकमंत्री श्री. राठोड यांच्या
हस्ते ध्वजारोहण झाले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख,
आमदार राजेंद्र पाटणी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, प्रभारी जिल्हाधिकारी तथा
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक
मोक्षदा पाटील, अपर जिल्हाधिकारी दिनेश वानखडे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश
हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराम
वानखेडे, उपविभागीय अधिकारी अभिषेक देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा
अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक,
लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले की, शेतीला
संरक्षित सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त
शिवार अभियानातून जिल्ह्यात जवळपास ७ हजार ६०० कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे ५०
हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला संरक्षित सिंचनाची सोय झाली आहे. या अभियानातून
चालू वर्षात जिल्ह्यातील १२० गावांमध्ये २ हजार ४४० कामे करण्याचे नियोजन करण्यात
आले आहे. मागेल त्याला शेततळे योजनेतून जिल्ह्यात ७५८ शेततळी पूर्ण झाली आहेत. धडक
सिंचन व मनरेगा योजनेतून गेल्या दोन ते अडीच वर्षात पूर्ण झालेल्या सुमारे ५ हजार
सिंचन विहिरींमुळे संरक्षित सिंचनाखालील क्षेत्रात वाढ होण्यास मदत झाली आहे. विदर्भ
व मराठवाड्यातील दुष्काळ प्रवण जिल्ह्यांमध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प
राबविला जात असून याकरिता वाशिम जिल्ह्यातील १४९ गावांची निवड झाली आहे. या
प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात ८ गावांमध्ये कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली
आहे.
शेतकरी गटांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी
राज्य शासनाने गट शेतीस प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता प्रत्येक
गटास १ कोटी रुपयांपर्यंत अर्थसहाय्याची तरतूद केली आहे. जिल्ह्यातील ६ गटांची या
योजनेसाठी निवड झाली आहे. जिल्ह्यात गतवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा तुरीची आधारभूत
दराने पणन विभागामार्फत खरेदी केली जाणार आहे. केंद्र शासनाने यावर्षी तुरीची
आधारभूत किंमत बोनससह ५ हजार ४५० रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे. ऑक्टोबर
ते डिसेंबर २०१६ दरम्यान बाजार समित्यांमध्ये सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना
प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान शासनाने जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील
४४ हजार ३६२ शेतकऱ्यांना सुमारे १३ कोटी ५४ लक्ष रुपये अनुदान वितरीत करण्यात आले
आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकरी कर्जमाफी व
प्रोत्साहनपर अनुदान वितरणाची कार्यवाही वेगाने सुरु असल्याचे पालकमंत्री श्री.
राठोड यावेळी म्हणाले.
केंद्र व राज्य शासनाच्या
सहयोगाने नीती आयोग देशातील ११५ जिल्ह्यांसाठी ‘कन्व्हर्जन, इंटेग्रेशन अँड फोकस्ड
अटेंशन टू बॅकवर्ड डिस्ट्रिक्टस’ उपक्रम राबवीत आहे. या उपक्रमात वाशिम जिल्ह्याची
निवड झाली आहे. या अंतर्गत कृषी, सिंचन, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पोषण,
आर्थिक समावेशकता या बाबींवर भर दिला जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी
सांगतिले. आदिवासी जमिनी, शासकीय जमिनी, वाटप केलेल्या शासकीय जमिनींची माहिती एका
क्लिकवर मिळावी, यासाठी वाशिम जिल्हा प्रशासनाने तयार केलेली लँड बँक प्रणाली
राज्याने स्वीकारली आहे. ही आपल्या जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे पालकमंत्री
श्री. राठोड यावेळी म्हणाले.
पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासाठी २५ कोटी रुपयांच्या
विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. याकरिता प्रकल्प सल्लागार नियुक्तीची
कार्यवाही सुरु आहे. लोणी येथील श्री सखाराम महाराज संस्थानच्या विकासासाठी १०
कोटी १५ लक्ष रुपयांचा आराखडा मंजूर आहे. त्यासाठी निविदा निश्चितीची कार्यवाही
पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात पायाभूत सुविधा
निर्मितीवर विशेष भर दिला जात असून वाशिम ते पुसद मार्गावरील रेल्वे उड्डाण पूल व विविध
शासकीय इमारतींच्या उभारणीचे काम गतीने सुरु आहे. तसेच वाशिम येथे उभारण्यात
आलेल्या सुसज्ज नियोजन भवन इमारत व नवीन विश्रामगृह इमारतीचे उद्घाटन नुकतेच करण्यात
आल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी सांगितले.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जिल्ह्यातील
चारही नगरपरिषदा हागणदारीमुक्त झाल्या आहेत. ग्रामीण क्षेत्रातील कारंजा व
मंगरूळपीर तालुका हागणदारीमुक्त झाला असून संपूर्ण जिल्हा मार्च २०१८ अखेरपर्यंत
पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना,
महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची
प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री श्री.
राठोड यांनी परेड निरीक्षण केले. वाशिम पोलीस दलाचे
पुरुष व महिला पथक, होमगार्ड पुरुष
व महिला दल, बाकलीवाल विद्यालायचे एनसीसी पथक, यशवंतराव चव्हाण सैनिकी शाळेचे विद्यार्थी, नवोदय
विद्यालयाचे स्काऊट पथक, पोलीस बँण्ड पथक तसेच शिघ्र कृती दल
आदींनी मानवंदना दिली. स्वच्छ भारत अभियान, आरोग्य विभाग, वन विभाग, हरित
सेना आदी चित्ररथ या परेड मध्ये सहभागी झाले होते. वाशिम
पोलीस दलामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘वाशिम
वॉरियर्स’ नियतकालिकाचे यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते प्रकाशन
करण्यात आले. यावेळी विद्यासागर गुरुकुल इंग्लिश स्कूल, सन्मती कॉन्व्हेंट, हैप्पी
फेसेस व मालेगाव येथील बाल शिवाजी मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर
गितांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन शिरसाट व जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे यांनी केले.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
करणाऱ्या व्यक्ती, संस्थांचा सन्मान
जलयुक्त
शिवार अभियानात योगदान देणारे जलमित्र, ग्रामपंचायती, पत्रकार, अधिकारी व कर्मचारी
तसेच उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांचा यावेळी
पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रात
उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक यांनाही यावेळी
पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘स्मार्ट ग्राम’ ठरलेल्या सहा ग्रामपंचायती, पंचतारांकित
हरित शाळा व आदर्श पर्यावरण शिक्षक पुरस्कारांचेही पालकमंत्री संजय राठोड यांच्या
हस्ते यावेळी वितरण करण्यात आले.
ग्रामीण, शहरी भागातील पाणी टंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस
झाल्याने जिल्ह्यातील ५१० गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
ग्रामीण भागातील टंचाई निवारणार्थ ४ कोटी ४८ लक्ष रुपयांचा पाणी टंचाई कृती आराखडा
तयार करण्यात आला आहे. तसेच शहरी भागाकरिता ६ कोटी २० लक्ष रुपयांचा पाणी टंचाई
कृती आरखडा तयार करण्यात आला आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे. त्यामुळे
प्रत्येक नागरिकाने पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन पालकमंत्री संजय राठोड
यांनी यावेळी केले.
Comments
Post a Comment