जिल्ह्याच्या विकासासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर विशेष भर - पालकमंत्री संजय राठोड
·
नियोजनभवन,
विश्रामभवन इमारतींचे उद्घाटन
वाशिम, दि. १७ : शासनाच्या
जलयुक्त शिवार अभियानासारख्या विविध योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून
जिल्ह्याचा विकास साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच जिल्ह्याच्या विकासाला गती
देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर विशेष भर दिला जात असल्याचे प्रतिपादन महसूल
राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
नियोजन भवन व नवीन विश्राम भवन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र विधीमंडळाच्या पंचायती राज समितीचे अध्यक्ष
आमदार सुधीर पारवे, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, पंचायती राज समितीचे
सदस्य आमदार चरण वाघमारे, आमदार भरत गोगावले, आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा परिषद
उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा नियोजन
अधिकारी सुरेंद्र गवळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता काशिनाथ
गाडेकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले की, वाशिम जिल्ह्यात विविध
प्रशासकीय इमारती उभारणीच्या कामाला शासनाने प्राधान्य दिले आहे. यापैकी नियोजनभवन
व नवीन विश्रामभवन इमारतीचे आज उद्घाटन होत आहे. या दोन्ही इमारती जिल्ह्याच्या
वैभवात भर टाकणार आहेत. जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्याच्या विकासाला दिशा
देण्याचे काम करते. नियोजन भवनाच्या निर्मितीमुळे या समितीच्या कामकाजाला गती
मिळणार आहे. जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून शासन-प्रशासनातील अनेक
अतिमहत्त्वाच्या लोकांचे वाशिमला येणे-जाणे सुरु झाले आहे. मात्र विश्राम गृहाची
पुरेशी व्यवस्था नसल्याने अनेकदा अडचणी निर्माण होत होत्या. मात्र आता नवीन
विश्राम भवन झाल्याने ही समस्या सुटणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. तसेच या दोन्ही
इमारतींची उभारणी अतिशय नियोजनबद्धपणे केल्याबद्दल पालकमंत्री ना. राठोड यांनी
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे
अभिनंदन केले. शासन व प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी
प्रयत्न केले जात असून यामध्ये सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी
सांगितले.
आमदार सुधीर पारवे म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासाचे चोख
नियोजन होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे कामकाज महत्त्वाचे असते. नियोजन भवनाच्या
माध्यमातून जिल्हा नियोजन समिती, जिल्हा नियोजन विभागाला हक्काची प्रशासकीय इमारत
मिळाली आहे. त्यामुळे या समितीच्या प्रशासकीय कामास नक्कीच गती मिळेल, असे आमदार
पारवे यांनी सांगितले. जिल्ह्यात आजपासून पंचायती राज समितीचे कामकाज सुरु होत
असून याबाबत बोलताना ते म्हणाले की, येत्या तीन दिवसात समिती जिल्हाभर दौरा करून विविध
विकास कामांच्या अंमलबजावणीची माहिती घेणार आहे. तसेच प्रशासकीय कामकाजाचा आढावा
घेऊन सर्वसामान्य नागरिकांना कशाप्रकारे सेवा उपलब्ध करून दिल्या जातात, याचीही माहिती
घेऊन विकासासाठी आवश्यक बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे आमदार पारवे
यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले की, जिल्हा नियोजन
समितीसाठी स्वतंत्र सभागृह असावे, अशी समितीची मागणी होती. त्यानुसार जिल्हा
नियोजन समितीमार्फत नियोजनभवनाची उभारणी झाली आहे. फक्त दीड वर्षात अतिशय सुसज्ज व
अद्ययावत इमारतीची उभारणी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली. याठिकाणी ३०४ क्षमतेचे
सुसज्ज सभागृह तयार करण्यात आले असून याचा उपयोग सर्वच प्रशासकीय विभागांच्या
आढावा सभा व इतर उपक्रमांसाठी होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सार्वजनिक
बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता काशिनाथ गाडेकर यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा
नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी यांनी मानले.
पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते अधिकारी, अभियंत्यांचा
सत्कार
नियोजनभवन व नवीन विश्रामभवन
इमारतीच्या उभारणीत विशेष योगदान देणारे जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, सार्वजनिक
बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता काशिनाथ गाडेकर, उप अभियंता विजय चेके,
सहाय्यक अभियंता सतीश नांदगावकर, कु. पूजा रावले, कंत्राटदार व्ही. बी. जाधव, एम.
आर. व्यवहारे यांचा यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात
आला.
०००००
Comments
Post a Comment