स्मार्टफोन, इंटरनेटचा वापर करताना सावधगिरी बाळगा - अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे


·        सायबरविषयक जाणीवजागृती कार्यक्रम
·        जिल्हा पोलीस दल, जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजन
·        विविध सायबर गुन्हे, इंटरनेटचा सुरक्षित वापराविषयी मार्गदर्शन
वाशिम, दि. २३ : स्मार्टफोन, इंटरनेटचा वापर हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. मात्र इंटरनेटचा वापर तसेच स्मार्टफोनमधील विविध अॅपचा वापर करताना आवश्यक खबरदारी न घेतल्यास सायबर गुन्हेगार आपली माहिती किंवा बँक खात्यातील रक्कम लंपास करू शकतात. तसेच आपला मोबाईल, संगणक हॅक करून शकतात. त्यामुळे स्मार्टफोन तसेच संगणकाच्यामाध्यमातून इंटरनेटचा वापर करताना प्रत्येकाने सावधगिरी बाळगली पाहिजे व सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा वापर केला पाहिजे, असे अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांनी सांगितले.
‘ट्रान्सफोर्मिंग महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्यावतीने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी आयोजित सायबर जाणीवजागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) किरण धात्रक, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप आदी उपस्थित होते.
अपर पोलीस अधीक्षक श्रीमती गोरे म्हणाल्या की, स्मार्टफोनमधील विविध अॅपचा वापर करताना आपण त्याची सुरक्षिततेची पडताळणी केली पाहिजे. व्हॉटसअपसारखे सोशल मिडिया अॅप वापरताना त्याच्या सेटिंग्जची माहिती करून घ्या व सुरक्षिततेविषयी खबरदारी घ्या. सोशल मिडियावरील वैयक्तिक माहितीच्या आधारे आपला ई-मेल, इंटरनेट बँकिंग अकौंट हॅक केला जाऊ शकतो. त्यामुळे आपली वैयक्तिक माहिती सोशल मिडियावर टाकणे टाळावे.
इंटरनेट बँकिंग तसेच एटीएम कार्डचा वापर करून होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण अधिक आहे. असे प्रकार टाळण्यासाठी इंटरनेट बँकिंगसाठीचा पासवर्ड किमान आठ अक्षरी असावा. यामध्ये अक्षरांबरोबरच स्पेशल कॅरेक्टर व अंकांचा वापर करावा. एटीएम अथवा क्रेडीट कार्डद्वारे व्यवहार करताना आपले कार्ड स्कॅन होत नाही, याची खात्री करून घ्यावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड व एटीएम कार्डचा पिन कोणालाही देऊ नका. ऑनलाईन शॉपिंग करताना संबंधित कंपनीच्या मूळ वेबसाईटचा वापर करा. ई-मेलद्वारे प्राप्त लिंकद्वारे ऑनलाईन शॉपिंग करू नका, असा सल्ला श्रीमती गोरे यांनी यावेळी दिला. तसेच सायबर गुन्हेगारीविषयक माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पोलीस उपअधीक्षक श्री. धात्रक म्हणाले की, सायबर गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी खबरदारी हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपले ई-मेल, सोशल मिडिया, इंटरनेट बँकिंग अकौंटचा पासवर्ड बनविताना आवश्यक काळजी घेतली पाहिजे. तसेच आपण कोणत्याही सायबर गुन्ह्याचे शिकार झाल्याचे लक्षात आल्यास तत्काळ पोलीसांना त्याची माहिती देऊन आपले नुकसान टाळावे.
पोलीस निरीक्षक श्री. ठाकरे यांनीही यावेळी इंटरनेटच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. तसेच सायबर गुन्हा लक्षात आल्यानंतर काय करावे, याविषयी माहिती दिली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. वाढवे यांनी सायबर गुन्हे कसे घडतात, त्याला प्रतिबंध करण्यासाठी आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी फिशिंग, हॅकिंग, नायजेरियन फ्रॉड, सायबर बुलिंग, डेटा थेप्ट, क्रिप्टोग्राफी, सॉफ्टवेअर पायरसी, पोर्नोग्राफी, सायबर दहशतवाद आदी गुन्ह्याविषयी माहिती दिली. तसेच अशा गुन्ह्यांमध्ये कोणकोणत्या कलमानुसार काय शिक्षा होऊ शकते, याविषयी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या सहाय्याने सादरीकरण केले. सायबर सेलचे प्रदीप डाखोरे यांनीही यावेळी सायबर गुन्हेगारी प्रतिबंधासाठी उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सायबर सेलचे अमोल काळमुंदळे, जिल्हा माहिती कार्यालयाचे दिलीप काळे, विजय राठोड, प्रमोद राठोड, विश्वनाथ मेरकर यांनी सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे