कर्जमाफीपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही - किशोर तिवारी


·        कापूस, सोयबीन हमीभाव खरेदीचा आढावा
·        आरोग्य यंत्रणेमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना
·        सर्व गरीब नागरिकांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ द्या
वाशिम, दि. २७ :  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असून या कर्जमाफीपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, असे कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विविध शासकीय विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डी. एल. जाधव, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे आदी उपस्थित होते.
श्री. तिवारी म्हणाले, कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या यादीतील बिनचूक माहिती असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, याची खबरदारी घेण्यात आली असून या योजनेपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही. शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये तांत्रिक कारणाने त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सोयाबीन व कापसाची हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नाफेडमार्फत उडीद व मुगाची खरेदी होणार आहे. या सर्व खरेदी केंद्रांवर फक्त शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जाईल, कोणत्याही व्यापाऱ्याचा माल खरेदी केला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच याठिकाणी शेतमाल विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्याची कोणतही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही श्री. तिवारी यांनी यावेळी दिल्या.
श्री. तिवारी म्हणाले, जिल्हा सामान्य रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा मिळणे आवश्यक आहे. याकरिता वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात यावीत. तसेच या रुग्णालयांची अंतर्गत स्वच्छतेबाबत विशेष खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. ग्रामीण भागातील सरसकट सर्व गरीब कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे. या योजनेपासून एकही कुटुंब वंचित राहू नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करा, असे श्री. तिवारी यांनी यावेळी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले जनकल्याण आरोग्य योजना, कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झालेले शेतकरी, पोकरा प्रकल्पाची प्रगती, प्रधानमंत्री घरकुल योजना आदी योजनांचा आढावा घेतला.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश