कृषि सेवा केंद्रामध्ये गुणनियंत्रक अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक प्रसिद्ध करा - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी



·        ‘आत्मा’ नियामक मंडळाची आढावा बैठक
·        शेतीपूरक व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करा
·        सोयाबीन, तूर पिकाला पर्याय देण्यासाठी प्रयत्न करा
वाशिम, दि. ०९ : बियाणे, कीटकनाशक वापराबद्दल योग्य माहिती घेण्यासाठी तसेच बोगस बियाणे, औषधे याविषयी तक्रार करण्यासाठी कृषि विभागाचे गुणनियंत्रक अधिकारी व क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणे आवश्यक आहे. याकरिता कृषि विभागाचे गुणनियंत्रक अधिकारी व संबंधित गाव, मंडळ, तालुक्याचे क्षेत्रीय अधिकारी यांच्यासह जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक असलेला फलक जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्रांच्या दर्शनी भागामध्ये लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज दिल्या. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)च्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. डी. एल. जाधव, अनिसा महाबळे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ. भरत गीते यांच्यासह नियामक मंडळाचे अशासकीय, शासकीय सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले, शेतकऱ्यांना बियाणे अथवा कीटकनाशकाची निवड करताना तसेच त्याच्या वापराबाबत अनेकदा कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेण्याची आवश्यकता भासते. अशावेळी अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक सहजपणे उपलब्ध झाल्यास शेतकरी त्यांच्याशी संपर्क साधून मार्गदर्शन घेऊ शकतात. तसेच बोगस बियाणे, कीटकनाशक यांची विक्री होत असल्यास त्याची तक्रार करण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीचे होण्यासाठी प्रत्येक कृषि सेवा केंद्रांमध्ये कृषि विभागाचे गुणनियंत्रक व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची यादी तातडीने प्रसिद्ध करावी. याबाबत प्रत्येक अधिकाऱ्याला कामाचे वाटप करण्यात यावे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

जिल्ह्यात शासनाची विविध योजनांमुळे सिंचन सुविधेत वाढ झाली आहे. अशा ठिकाणी जनावरांसाठी बारमाही चारा उपलब्ध होऊ शकतो. अशा गावांची निवड करून तेथील शेतकऱ्यांना शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. याकरिता शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. त्याचबरोबर जिल्ह्यातील सोयाबीन, तुरीच्या पिकाला पर्याय उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने ‘आत्मा’मार्फत पिक प्रात्यक्षिके घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच जिल्ह्यातील यशस्वी शेतकरी, शेतीपूरक उद्योग याचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. अशासकीय सदस्यांनी मांडलेल्या विविध विषयांच्या अनुषंगाने यावेळी चर्चा करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश