जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा


वाशिम, दि. १३ :  दि. १५ ऑक्टोंबर हा भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येतो. यावर्षी दि. १५ ऑक्टोंबर २०१७ रोजी शासकीय सुट्टी असल्याने दि. १३ ऑक्टोंबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार आज जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी यांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रमेश काळे होते.
यावेळी  जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्र. म. राठोड,  डॉ. नालेगावकर, समाधान अवचार, ज्ञानदेव भालेराव आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. गवळी म्हणाले, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन आपले ध्येय साध्य केले. प्रचंड मेहनतीच्या जोरावर आणि चिकाटीने स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र निर्मिती करून देशाला सक्षम बनविले. अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या डॉ. कलाम यांनी आपल्या कार्यातून देशाच्या संरक्षण क्षमतेत वाढ करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. त्यामुळे त्यांची ओळख मिसाईल मॅन अशी बनली. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनामुळे युवा पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत होईल.

डॉ. नालेगावकर म्हणाले, वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने सर्व युवकांनी नियमित वाचनाचा संकल्प करावा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी वाचन आवश्यक असून त्याची नियमित सवय लावून घेणे गरजेचे आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. राठोड यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले व वाचनाचे महत्त्व सांगितले. जिल्हा ग्रंथालयाच्या इमारतीचे काम प्रगतीपथावर असून लवकरच ही इमारत वाचकांसाठी उपलब्ध होईल. त्यामुळे वाचकांना विशेषतः विद्यार्थ्यांना उत्तम सेवा पुरविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ लिपिक अजय सिरसाट यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश