समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय उभारणीसाठी प्रयत्न करा - विभागीय आयुक्त पियुष सिंह






वाशिम, दि. २० :  शेतीमधील उत्पादन वाढीबरोबरच इतर शेतीपूरक व्यवसायांची उभारणी करण्यासाठी समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न केले जावेत. याकरिता शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करून व्यवसाय उभारणीसाठी प्रोत्साहित करण्याच्या सूचना अमरावतीचे विभागीय आयुक्त तथा प्रकल्प संचालक पियुष सिंह यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाच्या आढावा बैठकीत दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाचे जिल्हा सनियंत्रण व मुल्यांकन अधिकारी सर्जेराव ढवळे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे विभागीय समन्वयक राजू इंगळे, जिल्हा समन्वयक राजेश नागपुरे यांच्यासह संबंधित क्लस्टरच्या अंमलबजावणी यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना रेशीम शेती, मत्स्यशेतीसारखे शेतीपूरक व्यवसाय सुरु करून अतिरिक्त उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून प्रोत्साहित करा. तसेच क्लस्टरमध्ये जास्तीत जास्त दुध संकलन केंद्र सुरु करून शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाकडे वळविण्यावर भर दिल्यास या माध्यमातून शेतीपूरक व्यवसायाचा चांगला पर्याय तयार होऊ शकतो. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतीमधील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या. समन्वयीत कृषी विकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील सहा क्लस्टरमध्ये राबविण्यात असलेल्या उपक्रमांचा तसेच नियोजित कामांचा आढावा विभागीय आयुक्तांनी यावेळी घेतला.



विभागीय आयुक्तांनी केली शेलगाव बोंदडे येथील बीज प्रक्रिया केंद्राची पाहणी
समन्वयीत कृषी विकास प्रकल्पांतर्गत उभारणी करण्यात आलेल्या शेलगाव बोंदडे (ता. मालेगाव) येथील विदर्भ सीड्स कृषी विज्ञान मंडळाच्या बीज प्रक्रिया केंद्राची विभागीय आयुक्त तथा प्रकल्प संचालक पियुष सिंह व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी भेट देऊन पाहणी केली. या केंद्रावर सध्या हरभरा बीज प्रक्रिया सुरु असून याबाबत समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाचे जिल्हा सनियंत्रण व मुल्यांकन अधिकारी सर्जेराव ढवळे, केंद्राचे अध्यक्ष उमेश वाजूळकर यांनी माहिती दिली. परिसरातील ८ गावांमधील ३४० शेतकऱ्यांच्या सहाय्याने हरभरा बिजोत्पादन घेण्यात येत असून वाशिमसह हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यातही या केंद्रातील बीज प्रक्रिया केलेले बियाणे विक्रीसाठी पाठविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे