वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवावे - उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील कोरडे


·        ३ ऑक्टोंबर पासून मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम
·        ८ व २२ ऑक्टोंबर रोजी राबविली जाणार विशेष मोहीम
वाशिम, दि. २८ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दि. ३ ऑक्टोबर २०१७ ते दि. ५ जानेवारी २०१८ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या दरम्यान दि. ३ ऑक्टोंबर ते ३ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहे. याच कालावधीत नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज स्वीकारले जाणार असून वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीने मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील कोरडे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले.
मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमानुसार प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी मंगळवार दि. ३ ऑक्टोबर २०१७ रोजी केली जाणार आहे. दावे व हरकती दि. ३ ऑक्टोबर ते दि. ३ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत स्विकारल्या जाणार आहेत. मतदार यादीमधील संबंधीत भाग, सेक्शनच्या ग्रामसभा, स्थानिक संस्था येथे वाचन व आरडब्ल्यूएसोबत बैठक तसेच नावांची खातरजमा करण्याचे काम दि. ७ ऑक्टोबर आणि १३ ऑक्टोबर २०१७ रोजी केले जाईल. रविवार, दि. ८ ऑक्टोबर आणि दि. २२ ऑक्टोबर रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत दि. ५ डिसेंबर २०१७ पर्यंत आहे. डाटाबेसचे अद्ययावतीकरण आदी ‍दि. २० डिसेंबर २०१७ पर्यंत केले जाईल आणि दि. ५ जानेवारी २०१८ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

दि. ३ ऑक्टोंबर ते दि. ३ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्र स्तरीय अधिकारी उपस्थित राहून नवीन मतदार नोंदणी, नावातील किंवा पत्त्यामधील चुकांची दुरुस्ती यासह दुबार नावे, मयत मतदारांची नावे वगळणे आदीसाठी येणारे अर्ज स्वीकारतील. तहसीलदार कार्यालयात सुध्दा हे अर्ज सादर करता येतील. या अर्जांचे नमुने संबंधित मतदान केंद्र स्तरीय अधिकारी, तहसीलदार कार्यालामध्ये उपलब्ध आहेत. दि. ८ व २२ ऑक्टोंबर २०१७ रोजी सुट्टीच्या दिवशी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येकाने आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी आपले अर्ज सादर करावेत. महिला, तसेच स्थलांतरीत मतदारांनी आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याचे आवाहन श्री. कोरडे यांनी यावेळी केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे