महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी आवश्यक भूसंपादनाला गती द्या - विभागीय आयुक्त पियुष सिंह
·
मूल्यांकनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या
सूचना
वाशिम, दि. २० : नागपूर-मुंबई
दरम्यान होत असलेल्या महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी आवश्यक जमिनींचे थेट
खरेदीने भूसंपादन करण्याच्या कार्यवाहीला गती देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त
पियुष सिंह यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिल्या.
याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल
द्विवेदी यांच्यासह उपजिल्हाधिकारी तथा प्रशासक सुनील माळी, उपविभागीय अधिकारी
राजेश पारनाईक, डॉ. शरद जावळे, अभिषेक देशमुख, संबंधित तहसीलदार व इतर यंत्रणांचे
अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र समृद्धी
महामार्गाचा मोठा टप्पा वाशिम जिल्ह्यातून जात असल्याने येथील भूसंपादन प्रक्रिया
गतिमान होणे आवश्यक आहे. याकरिता संबंधित यंत्रणांनी मूल्यांकनाच्या कामाला गती
देऊन त्याबाबतची माहिती उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तातडीने सादर करावी. यामध्ये
कोणत्याही टप्प्यावर कसलाही विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी. उपविभागीय अधिकाऱ्यांनी
हे मूल्यांकन योग्य असल्याची खात्री करून तसेच आवश्यक बाबींची योग्यप्रकारे छाननी
करूनच सदर प्रकरणे जिल्हास्तरीय समितीकडे मूल्यांकनासाठी सादर करावीत. मूल्यांकने प्राप्त
झालेल्या गावांमधील खरेदी खताची प्रक्रिया गतिमान करावी. संबंधित तालुक्याच्या
तहसीलदारांकडेच खरेदी खताचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून महामंडळ व
उपविभागीय अधिकारी यांनी समन्वयाने खरेदी खताची प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचनाही
श्री. सिंह यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी
म्हणाले की, मूल्यांकनाची प्रक्रिया सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे.
यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी मूल्यांकनाच्या कामाला प्राधान्य द्यावे. तसेच उपविभागीय
अधिकाऱ्यांनी खरेदी खताची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी प्रयत्न करावेत. सप्टेंबर
अखेरपर्यंत जास्तीत जास्त खरेदी खत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्याच्या
सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
*****
Comments
Post a Comment