‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’मध्ये सहभागी व्हा


·        शिक्षणाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी यांची पत्रकार परिषद  
·        जिल्ह्यात १० हजार पेक्षा विद्यार्थी, युवक होणार सहभागी
·        शाळांमध्ये दि. १५ सप्टेंबर रोजी फुटबॉल स्पर्धा
वाशिम, दि. १२ : जागतिक फुटबॉल महासंघ (फिफा)च्या वतीने घेतली जाणारी १७ वर्षेखालील वर्ल्ड कप स्पर्धा भारतामध्ये होत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून राज्यातही ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’ उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत दि. १५ सप्टेंबर २०१७ रोजी सर्व शाळांमध्ये फुटबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात येणार असून विद्यार्थ्यांसोबतच युवक, नागरिकांनीही यादिवशी आपापल्या स्तरावर फुटबॉलचे सामन्यांचे आयोजन करून फुटबॉल खेळात सहभागी व्हावे, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरे व जिल्हा क्रीडा अधिकारी संजय पांडे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’च्या अनुषंगाने दि. २९ जुलै २०१७ पासून तयारी सुरु आहे. तसेच यामध्ये लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही दि. ६ सप्टेंबर २०१७ रोजी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेऊन दि. १५ सप्टेंबर रोजी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळात सहभागी करून घेण्याचे आवाहन केले आहे. दि. १५ सप्टेंबर २०१७ रोजी फुटबॉलचे सामने आयोजित करण्यासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील १०० शाळांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. तसेच भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी शाळांमध्ये चित्रकला, निबंध तसेच शुभेच्छा पत्रलेखन स्पर्धांचे आयोजन सुध्दा करण्यात येणार आहे, असे डॉ. नागरे यांनी यावेळी सांगितले.
दि. १५ सप्टेंबर रोजी ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’मध्ये जिल्ह्यातील १० खेळाडू सहभागी होणार आहेत. जिल्हा क्रीडा संकुल येथेही या उपक्रमांतर्गत ५ मैदाने तयार करण्यात आली असून याठिकाणी १००० विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच सर्व तालुकास्तरीय क्रीडा संकुल, विविध शाळा, मैदाने याठिकाणी फुटबॉल खेळाचे आयोजन होणार आहे. नोंदणी केलेल्या तसेच मैदाने उपलब्ध असलेल्या शाळांना ८६६ फुटबॉलचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी दि. १५ सप्टेंबर रोजी फुटबॉल खेळून ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. पांडे यांनी यावेळी केले.
*****

सोबत फोटो.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे