पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा वाशिम पाहणी दौरा वैद्यकीय, शैक्षणिक, क्रीडा व नागरी सुविधांचा घेतला आढावा, सेवा व सुविधा बळकट करण्याचे दिले निर्देश
- Get link
- X
- Other Apps
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा वाशिम पाहणी दौरा
वैद्यकीय, शैक्षणिक, क्रीडा व नागरी सुविधांचा घेतला आढावा, सेवा व सुविधा बळकट करण्याचे दिले निर्देश
वाशिम, दि. ३० एप्रिल (जिमाका)
राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास तसेच औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दि.३० एप्रिल रोजी विविध शासकीय संस्थांना भेटी देत आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि नागरी सुविधा क्षेत्रातील कामांची पाहणी केली. त्यांनी सेवा-सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना ठोस सूचना दिल्या.
दौऱ्याची सुरुवात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पाहणीने झाली. येथे त्यांनी रुग्णसेवा, आपत्कालीन विभाग, औषधसाठा, वसतिगृह व्यवस्था, ग्रंथालय व डिजिटल शिक्षणाच्या सुविधा यांचा आढावा घेतला. उपस्थित प्रशिक्षणार्थी , वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितले, "जास्तीत जास्त रुग्ण बरे होणे हीच आमची प्राथमिकता आहे."तुमच्या हातून गोरगरीब,गरजु रूग्ण बरे व्हावे व सत्कार्य घडोत.अश्या शुभेच्छा दिल्या.यावेळी शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सतिन मेश्राम यांनी कामकाजाची माहिती पालकमंत्र्यांना दिली.
यानंतर पालकमंत्री श्री.भरणे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या शासकीय वस्तीगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. वसतीगृहाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मारोती वाठ यांचे व गृहपाल श्री. वानखेडे यांचे कौतुक केले .
यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पाहणीत, पालकमंत्र्यांनी आरोग्य सेवा, स्वच्छता, औषध साठा याबाबत चौकशी केली.
डॉ. अनिल कावरखे यांनी रुग्णालयाच्या स्वयंपूर्णतेविषयी सविस्तर माहिती दिली.जिल्हा रूग्णालयाचे कामकाजाचे कौतुक करून उपचाराकरीता आलेल्या रूग्णांशी संवाद साधत पालकमंत्री श्री भरणे यांनी आस्थेने विचारपूस केली.
जिल्हा क्रीडा संकुलास भेट देतांना, पालकमंत्र्यांच्या हस्ते स्क्वॅश कोर्टाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी त्यांनी गुणवंत खेळाडूंचा सत्कार करून त्यांना प्रेरणा दिली.
खेळाडूंशी संवाद साधताना त्यांनी सांगितले, "क्रीडा हे केवळ मनोरंजनाचे नव्हे तर आरोग्य व चांगल्या व्यक्तिमत्वाचे माध्यम आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने खेळातही सक्रिय असावे."खेळात चमकदार कामगिरी केली तर त्याचा फायदा शिक्षणासोबतच भविष्यात मिळणाऱ्या नोकरीसाठी निश्चितच होतो. राज्याचा क्रीडामंत्री म्हणून वाशिम येथील क्रीडा संकुलास अत्याधुनिक सोयी सुविधा भविष्यात येणाऱ्या अडचणी आणि प्रश्न सोडविण्यास निश्चित माझे सहकार्य राहील असे उद्गार काढत पालकमंत्री यांनी उपस्थितांना आश्वासित केले.
उपसंचालक क्रीडा शेखर पाटील व जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी यावेळी उपलब्ध सुविधांची माहिती दिली.
दौऱ्याच्या शेवटी पालकमंत्री श्री.भरणे यांनी वाशिम शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम पाहिले.
तेथे त्यांनी आगारप्रमुख व ठेकेदारांना उच्च दर्जाचे काम सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षितता व बस सुविधा या बाबींचे काटेकोर नियोजन करण्याचेही आदेश दिले.
या दौऱ्यात आ. किरणराव सरनाईक, माजी जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. सतीन मेश्राम, डॉ. अनिल कावरखे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार निलेश पळसकर आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment