जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक





·        रिसोड तालुक्यातील विविध कामांची पाहणी
·        स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याचे आवाहान
वाशिम, दि. ०८ : राज्य शासन व भारतीय जैन संघटना (बीजेएस) यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्ह्यात जलसंधारणाची कामे सुरु आहेत. जून महिन्यामध्ये पावसाळा सुरु होत असल्याने जलसंधारणाच्या कामांसाठी आता जेमतेम दीड महिन्याचा कालावधी उपलब्ध आहे. या कालावधीत जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे होण्यासाठी या कामांमध्ये लोकसहभाग मिळणे महत्वाचे आहे. तसेच या कामांकरिता स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले. रिसोड तालुक्यात सुरु असलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित गावांतील उपस्थित नागरिक व शेतकऱ्यांशी संवाद साधून जलसंधारणाच्या कामांविषयी त्यांचे मत जाणून घेतले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा रोहयोचे उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार राजू सुरडकर, जलसंधारण विभागाचे उमेश देशमुख, जिल्हा परिषद लघुसिंचनचे श्री. खंदारकर, भारतीय जैन संघटनेचे तालुका समन्वयक राहुल मेने यांच्यासह संबंधित गावांतील लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, अनेक गावांमध्ये नाला खोलीकरण व तलावातील गाळ काढण्याची कामे गतीने सुरु आहेत. पावसाच्या आगमनापूर्वी अधिकाधिक कामे पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे. जलसंधारणाची ही कामे अधिक गतीने होण्यासाठी जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्था, संघटना यांनीही आपला सहभाग या कामांमध्ये द्यावा. या संस्था, संघटनांमार्फत जिल्ह्यात सुरु असलेल्या जलसंधारणाच्या कामांसाठी जेसीबी अथवा पोकलॅन उपलब्ध करून दिल्यास शासनामार्फत इंधन उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे जिल्ह्यातील नाला खोलीकरण व तलावातील गाळ काढण्याची कामे अधिक गतीने पूर्ण होवून त्याचा लाभ शेतकऱ्यांना होवू शकेल.
जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी रिसोड तालुक्यातील व्याड, चिखली, किनखेडा, मोहजा इंगोले याठिकाणी भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून झालेल्या कामांची पाहणी केली. तसेच रिसोड येथील पिंगलाक्षी तलावातील गाळ काढण्याच्या कामाला भेट देवून तेथील कामाचा आढावा घेतला. या तलावात अतिशय सुपीक गाळ मुबलक प्रमाणात उपलब्ध असून आजूबाजूच्या गावांतील शेतकऱ्यांना हा गाळ घेवून जाण्यासाठी प्रोत्साहित करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे