वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य नियोजन करा - विभागीय आयुक्त पीयूष सिंह
·
३३
कोटी वृक्ष लागवड मोहीम पूर्वतयारीचा आढावा
वाशिम, दि. २४ : राज्य शासनामार्फत यावर्षी राबविण्यात येत असलेल्या ३३ कोटी वृक्ष
लागवड मोहिमेंतर्गत वाशिम जिल्ह्यात सुमारे ४३ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
देण्यात आले आहे. वृक्ष लागवडीचे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित शासकीय
विभागांनी योग्य व परिपूर्ण नियोजन करून त्यानुसार अंमलबजावणी करावी, अशा सूचना
विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या वृक्ष लागवड
मोहिमेबाबतच्या आढावा बैठकीत दिल्या.
यावेळी
जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना,
अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, उपवनसंरक्षक सुमंत सोळंकी, निवासी
उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी महसूल रमेश काळे, जिल्हा पुरवठा
अधिकारी देवराव वानखेडे, राज्य उत्पादन शुल्कचे जिल्हा अधीक्षक अतुल कानडे, जिल्हा
अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक
उत्तम फड यांची प्रमुख उपस्थिती होती.
विभागीय
आयुक्त श्री. सिंह म्हणाले, वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत प्रत्येक विभागाला देण्यात
आलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक जमिनीची माहिती तसेच प्रत्यक्ष खोदण्यात
आलेल्या खड्ड्यांची माहिती अपलोड करणे आवश्यक आहे. सर्व शासकीय विभागांनी या
कामाला गती द्यावी. ज्या शासकीय विभागांकडे वृक्ष लागवडीसाठी जमीन उपलब्ध नाही,
अशा विभागांना शहरी अथवा ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवर वृक्षारोपण करता येईल. या
जमिनींची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उपलब्ध करून द्यावी. जिल्ह्यात
नव्याने होत असलेल्या महामार्गांच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करण्याचे नियोजन
संबंधित विभागांनी करावे. तसेच जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागाच्या सर्व मध्यम व
लघु प्रकल्पांच्या परिसरातही वृक्षारोपण करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
विविध
शासकीय विभागांना देण्यात आलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट व त्यानुसार संबंधित
विभागांनी केलेली पूर्वतयारी याविषयीचा आढावा विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी
यावेळी घेतला. यावेळी जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा कृषि विकास अधिकारी श्री.
शेळके, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी
अभियंता श्री. चौधरी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश
राठोड, शिक्षणाधिकारी प्राथमिक अंबादास मानकर, जिल्हा कौशल्य विकास व मार्गदर्शन
केंद्राच्या सहाय्यक संचालक सुनंदा बजाज, प्रभारी जिल्हा प्रशासन अधिकारी तथा
तहसीलदार शीतल वाणी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment