बियाणे, खते विषयक तक्रारींच्या निवारणासाठी तालुकास्तरावर कक्ष स्थापन करा – पालकमंत्री संजय राठोड
· जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा सभा
·
पीक कर्ज वाटपाची गती वाढविण्याच्या
सूचना
वाशिम, दि. २२ : आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे व खते
उपलब्ध करून देण्यात यावे. त्यादृष्टीने परिपूर्ण नियोजन करावे. तसेच बियाणे व
खतांविषयी शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर
स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याच्या सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व
आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा
देशमुख, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश
हिंगे, कृषि सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, कृषि
व पशुसंवर्धन समिती सभापती विश्वनाथ सानप, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय
गावसाने, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक विजय खंडरे, जिल्हा
अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांच्यासह कृषि, सहकार, लघुपाटबंधारे,
जलसंधारण विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री
श्री. राठोड म्हणाले, खरीप हंगामा दरम्यान बोगस बियाणे, खते विक्रीस
येण्याची शक्यता असते. त्यामुळे बोगस बियाणे, खते विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी
भरारी पथके स्थापन करावीत. शेतकऱ्यांची बियाण्यांच्या गुणवत्तेसंदर्भात, खतांच्या उपलब्धते
संदर्भात,
भेसळ विषयी तक्रारीचे निवारण करण्यासाठी तालुका स्तरावर, पंचायत समितीमध्ये
तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात यावी. याबाबत शेतकऱ्यांना माहिती
देण्यासाठी गावात दवंडी देवून व वृत्तपत्रांमधून प्रसिद्धी देण्याच्या सूचनाही
त्यांनी यावेळी केल्या.
जिल्ह्यात
खरीप पिक कर्ज वाटपाचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे आ. पाटणी यांनी यावेळी निदर्शनास
आणले. राष्ट्रीयकृत बँकांकडून पिक कर्ज वाटप होत नसल्याने पात्र शेतकरी पिक
कर्जापासून वंचित राहत असल्याचे त्यांनी सांगितले. १५ जून पर्यंत जिल्ह्यातील
प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पिक कर्ज मिळाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी
केली. यावेळी पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, जिल्हा अग्रणी बँकेच्या
व्यवस्थापकांनी सर्व राष्ट्रीयकृत बँकांना पिक कर्ज वाटपाची गती वाढविण्याबाबत
सूचना द्याव्यात. किसान क्रेडीट कार्ड नसल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेतून पिक
कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यास अडचणी येत असून याबाबत सुध्दा तातडीने
कार्यवाही करून संबंधित शेतकऱ्यांना त्यांना मंजूर पिक कर्जाची रक्कम तातडीने अदा
करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
रिसोड
तालुक्यातील काही शेतकऱ्यांचे दुष्काळी मदतीचे पैसे कर्ज खात्यात जमा झाल्याचा
मुद्दा आ. झनक यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले,
अशा प्रकारे कोणत्याही बँकेला दुष्काळी मदतीचे पैसे शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात जमा
करता येणार नाहीत. त्यामुळे जिल्हा अग्रणी बँकेने तत्काळ संबंधित बँकांना सक्त
ताकीद देवून दुष्काळी मदत अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना अदा करण्याबाबत सूचित करावे,
असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. कृषिपंप वीज जोडणी, नानाजी देशमुख कृषि
संजीवनी प्रकल्प अंतर्गत कामांना गती देण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
खरीप हंगामात
जिल्ह्यात ४ लक्ष १५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन आहे. यामध्ये २ लक्ष
९० हजार हेक्टरवर सोयाबीन, ६० हजार हेक्टरवर तूर, २५ हजार हेक्टरवर कपाशी, १५ हजार
हेक्टरवर मुग व २० हजार हेक्टरवर उडीद या प्रमुख पिकांच्या पेरणीचे नियोजन आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १ लक्ष ०५ हजार ६६२ क्विंटल बियाणे आवश्यक असून त्याची मागणी
नोंदविण्यात आली आहे. आतापर्यंत ६१ हजार ४१० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असून
उर्वरित बियाणे सुद्धा लवकरच उपलब्ध होईल. तसेच खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ५० हजार
मेट्रिक टन खताची आवश्यकता असून तशी मागणी नोंदविण्यात आली असून ४९ हजार ४१९ मेट्रिक
टन खत मंजूर झाले आहे. यापैकी सध्या १६ हजार ७८१ मेट्रिक टन उपलब्ध झाले असून टप्प्या-टप्प्याने
आवश्यक खत उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात खतांचा व बियाणांचा तुटवडा निर्माण होणार
नाही, याकरिता नियोजन करण्यात आल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. गावसाने
यांनी यावेळी सांगितले.
*****
Comments
Post a Comment