पाणी टंचाई निवारणाच्या उपाययोजनांमध्ये दिरंगाई नको - पालकमंत्री संजय राठोड
·
जिल्ह्यातील पाणी
टंचाई निवारणाचा आढावा
वाशिम, दि. २२ : जिल्ह्यातील पाणी टंचाई निर्माण झालेल्या गावांना पिण्याच्या
पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांच्या मंजुरी व अंमलबजावणीत कोणत्याही
प्रकारची दिरंगाई होवू देवू नका, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांच्या आढावा बैठकीत
ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा
देशमुख, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश
हिंगे, कृषि सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, कृषि
व पशुसंवर्धन समिती सभापती विश्वनाथ सानप यांच्यासह कृषि, सहकार, लघुपाटबंधारे,
जलसंधारण विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री
श्री. राठोड म्हणाले, जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली
आहे, तेथे तातडीने उपाययोजना मंजूर करून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुरविणे
आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवरून सर्व प्रक्रिया गतिमान करावी. पाणी
टंचाई निवारणार्थ उपाययोजना मंजुरीबाबतची कार्यवाही प्रथम प्राधान्याने करून त्याची
अंमलबजावणी तत्काळ सुरु करावी. कोणत्याही स्तरावर हे प्रस्ताव प्रलंबित राहणार
नाहीत, याची दक्षता घ्यावी. पाणी टंचाई निवारणासाठी मंजूर करण्यात आलेली नळ योजना विशेष
दुरुस्तीची कामेही लवकरात लवकर पूर्ण करावीत. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार
हमी योजनेअंतर्गत कामांची मागणी आल्यास तातडीने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी
आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
जिल्हाधिकारी
श्री. मोडक म्हणाले, जिल्ह्यात सध्या ४७ गावांमध्ये ४६ टँकरद्वारे पाणी पुरवठा
केला जात आहे. २३० गावांमध्ये २९० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून त्याद्वारे
पाणी पुरवठा सुरु आहे. पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांवर तातडीने निर्णय
घेण्याबाबत संबधितांना निर्देशित करण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
*****
Comments
Post a Comment