शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेतीपूरक व्यवसाय सुरु करा - सर्जेराव ढवळे
· साखरा येथे ‘संवादपर्व कार्यक्रमात कृषीपूरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन वाशिम , दि . ३० : शेतीवरील अवलंबित्व कमी करून शाश्वत उत्पन्नाचे साधन निर्माण करण्यासाठी शेतीला जोडधंदा असणे आवश्यक आहे. शेतीपूरक व्यवसाय निर्मितीसाठी शासन विविध योजना राबविते. या योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी छोटे-छोटे व्यवसाय सुरु करावेत, असे आवाहन समन्वयीत कृषी समृद्धी प्रकल्प (केम)चे व्यवस्थापक सर्जेराव ढवळे यांनी केले. साखरा येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने व गणेशोत्सव मंडळाच्या सहकार्याने आयोजित ‘संवादपर्व’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी साखराचे उपसरपंच मोहन इंगळे, आदर्श गाव समितीचे अध्यक्ष रामराव इंगळे, शाळा व्यवस्थापन समितीचे रामप्रसाद इंगळे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर इंगळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप, दिलीप काळे, प्रमोद राठोड, ग्राम कार्यकर्ता सुखदेव इंगळे आदी उपस्थित होते. श्री. ढवळे म्हणाले की, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांचे शेतीवरील अवलंबित्व कमी होऊन उत्पन्नाची इतर...