वीज ग्राहकांच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करा - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
·
ऊर्जामंत्र्यांचा
वाशिम जिल्ह्यातील वीज ग्राहकांशी थेट संवाद
·
वीज
जोडणीसाठी पैसे मागणाऱ्यांविरोधात पोलीस तक्रार करण्याचे आवाहन
·
मानवी अपघाताची
प्रलंबित प्रकरणे सात दिवसांत निकाली काढण्याचे आदेश
·
मुख्यालयी
न राहणाऱ्या अधिकारी, अभियंते, कर्मचाऱ्यांचे घरभाडे भत्ते बंद करणार
वाशिम, दि. १८ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व वीज ग्राहकांनी जनतेशी
थेट संवाद कार्यक्रमात मांडलेल्या तक्रारी सोडविण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी,
अभियंते यांनी तात्काळ कार्यवाही करून याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश
ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी आज दिले. महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित
कार्यक्रमात जनतेशी थेट संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी खासदार भावना गवळी, आमदार लखन
मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, माजी आमदार विजयराव जाधव, महावितरणचे
प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर,
अधीक्षक अभियंते विनोद बेथारीया, अनिल डोये, राकेश जनबंधू आदी उपस्थित होते.
ना. बावनकुळे म्हणाले की, वीज जोडणीच्या
साहित्याची अथवा नादुरुस्त रोहित्राची वाहतूक करण्याची जबाबदारी महावितरणची आहे. सोबतच
जिल्ह्यातील ग्राहकांना वीज जोडणीसाठी कोणीही अवैधरीत्या पैशाची मागणी केल्यास तात्काळ
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे किंवा पोलीस विभागाकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहन
केले. याचवेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना शेतकऱ्यांच्या तक्रारी
नोंदवून घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यावेळी काही
शेतकऱ्यांनी कृषीपंप वीज जोडणीसाठी कंत्राटदारांचे कामगार अवैधरीत्या पैशाची मागणी
करीत असल्याची तक्रार केली. ऊर्जामंत्र्यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत सदर
कंत्राटदाराशी लगेच भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून अशा तक्रारी आल्यास काम काढून
घेण्याचा इशारा दिला.
पांगराबंदी येथील काही शेतकऱ्यांनी शेतीमध्ये
असलेले वीज खांब वाकले असल्याने शेतीच्या मशागतीसाठी अडथळा निर्माण होत असल्याचे
सांगितले. यावेळी ना. बावनकुळे यांनी जिल्ह्यात शेतीखाली असलेल्या क्षेत्रातील
सर्व वीज खांब सिमेंट काँक्रीटीकरण करून स्टे लावण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे
निर्देश दिले. तसेच अंगणवाडी, शाळा परिसरातील वीज अपघात प्रवण स्थळे काढून
टाकण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यात विजेमुळे झालेले मानवी
अपघाताच्या प्रलंबित प्रकरणांवर येत्या सात दिवसांत कार्यवाही करण्याचेही ना.
बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
ग्राहकांनी वीज बिलाच्या अनुषंगाने या
कार्यक्रमात अनेक तक्रारी दाखल झाल्या. याची दखल घेत ऊर्जामंत्र्यांनी वाशिम
जिल्ह्यातील ग्राहकांकरिता या महिन्याच्या शेवटी विशेष शिबीर घेऊन वीज बिलातील
त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले. तसेच संपूर्ण जिल्ह्यातील ग्राहकांनी महावितरणच्या
मोबाईल अॅप वापर केल्यास त्यांच्या अनेक तक्रारी दूर होऊन, घरबसल्या अनेक
सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात वीज पुरवठा बंद असणे,
विद्युत वाहिन्या तुटल्यामुळे वीज पुरवठा खंडित होणे, रोहित्र हटविणे, वेळेत
कोटेशन न मिळणे, मजूर रोहीत्रांच्या जोडणीस होत असलेला विलंब, उपकेंद्रांची मागणी,
प्रलंबित घरगुती व कृषीपंप जोडण्या, गावातील व शेतातील वीज वाहिन्याची दुरुस्ती, अनुकंपावर
नोकरी आदी विषयाच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारींचा निपटारा
करण्यासाठी सर्व क्षेत्रीय अभियंत्यांनी दर शुक्रवारी व शनिवारी आपल्या
कार्यक्षेत्रात दौरे करावेत. तक्रारींच्या स्वरूपानुसार सात दिवस ते दोन
महिन्यांपर्यंत तक्रारींचा निपटारा करण्याच्या सूचना ना. बावनकुळे यांनी दिल्या. प्राप्त
झालेल्या तक्रारींपैकी काही गंभीर प्रकरणामध्ये तीन अभियंते व एका लिपिकांना कारणे
दाखवा नोटीस बजावून दोषींवर पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच जिल्ह्यात
नियुक्तीच्या ठिकाणी न राहणाऱ्या अधिकारी, अभियंते व कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता
बंद करण्यात यावेत. अभियंत्यांचे गोपनीय अहवालातील नोंदी त्यांच्या क्षेत्रात
असलेल्या वीज गळतीच्या टक्केवारीवर निश्चित केल्या जाणार असल्याचे ना. बावनकुळे
यांनी यावेळी सांगितले.
Comments
Post a Comment