वृक्ष लागवड मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा होणार सन्मान - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी



·        लोकसहभागातून वृक्ष लागवड, संवर्धन होणे आवश्यक
·        स्वयंसेवी संस्थानीही पुढाकार घेण्याचे आवाहन
वाशिम, दि. १६ : पन्नास कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम अंतर्गत दि. १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत राज्यात ४ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभाग नोंदवून आपल्या आपल्या लोकसंख्ये इतकी वृक्ष लागवड करणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा स्वातंत्र्य दिनादिवशी सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक आर. बी. गवई, कारंजाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, वाशिमच्या उपविभागीय अधिकारी कु. क्रांती डोंबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावासाने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्यासह सर्व तहसीलदार व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
वाशिम जिल्ह्याला ५ लक्ष हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या अनुषंगाने ५ लक्ष २२ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वन विभागामार्फत १ लक्ष ३० हजार, सामाजिक वनीकरण विभागामार्फत ५९ हजार, जिल्हा परिषद स्तरावरून २ लक्ष ६४ हजार आणि इतर विभागांमार्फत ६९ हजार वृक्ष लागवड करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. आतापर्यंत २ लक्ष ८३ हजार ५६५ खड्डे खोदण्यात आले आहेत. या सर्व खड्ड्यांचे जीपीएस मॅपिंग करण्यात येणार आहे. उर्वरित खड्डे ३१ मे २०१७ पर्यंत खोदून पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणाप्रमुखांना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
सध्या जिल्ह्यात वन विभागाच्या १० रोपवाटिका आहेत. त्यामध्ये ६ लक्ष रोपे उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक वनीकरण विभागाकडे २३ रोपवाटिका असून त्यामध्ये ७ लक्ष ८९ हजार रोपांची उपलब्धता आहे. याप्रमाणे जिल्ह्यात एकूण ३३ रोपवाटीकांमध्ये १३ लक्ष ८९ हजार रोपे उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करण्यासाठी या मोहिमेत लोकसहभाग मिळणे आवश्यक आहे. गतवर्षी कारेंजा तालुक्यातील भामदेवी येथील ग्रामस्थांनी प्रत्येकाच्या नावे एक याप्रमाणे २५८० वृक्षांची लागवड केली. तसेच मंगरूळपीर तालुक्यातील पारवा येथील ग्रामस्थांनीही वृक्षारोपण मोहिमेत एकजुटीने सुमारे ६ एकर परिसरात ३५०० रोपांची लागवड केली. येथील स्थानिक ग्रामस्थांनी  घेतलेल्या पुढाकारामुळे या रोपांची चांगली निगा राखली जात आहे. भामदेवी व पारवा येथील ग्रामस्थांकडून प्रेरणा घेऊन जिल्ह्यातील इतरही गावांनी दि. १ ते ७ जुलै दरम्यान होणाऱ्या वृक्ष लागवड मोहिमेत पुढाकार घ्यावा. यावर्षी आपल्या ग्रामपंचायतीच्या लोकसंख्ये एवढी वृक्षांची लागवड करणाऱ्या ग्रामपंचायतींचा स्वातंत्र्य दिनादिवशी सन्मान करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यावेळी म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे