वाशिम जिल्ह्यातील सर्व विद्युत उपकेंद्रांची क्षमता वाढविणार - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे




·         जिल्ह्यातील तीन विद्युत उपकेंद्रांच्या कामांचे भूमिपूजन
·         डोंगरकिन्ही, कुऱ्हा उपकेंद्राचे कामही लवकरच सुरु होणार
·         ग्रामपंचायत, नगरपरिषदमध्ये विद्युत व्यवस्थापक नेमणार
·         बेरोजगार अभियंत्यांना ७५ लाखांपर्यंतची कामे देण्याच्या सूचना
वाशिम, दि. १८ :  जिल्ह्यातील अनेक ३३/११ के.व्ही.ची उपकेंद्रे अतिभारीत झाल्यामुळे वीज जोडण्या प्रलंबित आहेत. तसेच पुरेसा दाबाने वीज पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे या सर्व उपकेंद्राची क्षमता ५ एम.व्ही.ए. वरून १० एम.व्ही.ए. करण्यात येणार आहे. याकरिता प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात बेलमंडल (ता. कारंजा), आसेगाव पेन (ता. रिसोड) व कुपटा (ता. मानोरा) येथील ३३/११ के.व्ही. विद्युत उपकेंद्रांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खासदार भावना गवळी, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, माजी आमदार विजयराव जाधव, महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, अधीक्षक अभियंते विनोद बेथारीया, अनिल डोये, राकेश जनबंधू आदी उपस्थित होते.
ना. बावनकुळे म्हणाले की, वाशिम जिल्ह्यातील विद्युत यंत्रणा सक्षमीकरणासाठी १५० कोटी रुपये निधी देण्यात आला असून या निधीतील सर्व कामे पुढील दीड वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. आज दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेतील तीन उपकेंद्राचे भूमिपूजन संपन्न झाले आहे. इन्फ्रा-२ अंतर्गत मंजूर असलेल्या रिसोड तालुक्यातील कुऱ्हा, मालेगाव तालुक्यातील डोंगरकिन्ही या उपकेंद्रांचेही काम लवकरच सुरु होणार आहे. तसेच झोडगा उपकेंद्राचे काम जूनअखेर पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रलंबित वीज जोडण्या, भारनियमनाची समस्या बहुतांशी प्रमाणात निकाली निघणार आहे. विजेचा भार कमी करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना ऊर्जा बचत करणारे विद्युत पंप वापरण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. जुन्या कृषीपंपधारकांना ऊर्जा बचत करणारे पंप घेण्यासाठी महावितरण ५० टक्के अनुदान देईल, असे ऊर्जामंत्री यावेळी म्हणाले.
जिल्ह्यातील विद्युत सक्षमीकरणाच्या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी प्राप्त करून घेण्याच्या सूचनाही ना. बावनकुळे यांनी यावेळी दिल्या. या निधीतून होणारी कामे प्राधान्याने जिल्ह्यातील बेरोजगार अभियंत्यांनाच देण्यात यावीत. या कामांचे लॉटरीपध्दतीने वाटप करण्यात यावे. याकरिता जिल्ह्यातील बेरोजगार अभियंत्यांचा मेळावा घेऊन त्यांना रजिस्ट्रेशन देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे २८० कोटी रुपये वीज बिल थकबाकी आहे. शेतकऱ्यांच्या थकबाकीवरील दंड, व्याज माफ करून त्यांच्याकडील वीज बिलाची मूळ रक्कम पाच टप्प्यात भरण्यासाठी सूट देण्यात येणार असून यातून जमा होणारी रक्कम याच जिल्ह्यातील विजेच्या पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील वीज समस्या सोडविण्यासाठी व वीज जोडण्यांची देखभाल, दुरुस्ती करण्यासाठी ३ हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये स्वतंत्र ग्राम विद्युत व्यवस्थापकाची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी संबंधित ग्रामपंचायतीने ठराव करून आयटीआय वीजतंत्री पात्रताधारक उमेदवाराचे नाव महावितरणकडे द्यावे. या उमेदवाराला महावितरणकडून तीन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्री ना. बावनकुळे म्हणाले. तसेच नगरपरिषद क्षेत्रातही नगर विद्युत व्यवस्थापक नेमण्याचे विचाराधीन असून लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खा. गवळी यांनी यावेळी गेल्या दोन वर्षात भारनियमन कमी झाल्याचे सांगून महावितरणची चांगली सेवा मिळत असल्याबद्दल  ऊर्जामंत्र्यांचे कौतुक केले. आ. पाटणी म्हणाले की, वाशिम जिल्ह्यात महावितरणचा एकच विभाग असून भौगोलिक परिस्थिती पाहता कारंजा येथे नवीन विभाग निर्माण करण्याची आवश्यक आहे. वाशिम व कारंजा तालुक्यात शहर व ग्रामीण भागासाठी स्वतंत्र उपविभाग करण्यात यावेत. तसेच मानोरा तालुक्यात १३२ के.व्ही. क्षमतेच्या उपकेंद्राची मागणी केली. आ. झनक यांनी निवासी घरावरून गेलेल्या वीज वाहिन्या तातडीने हटविण्याबरोबरच जुन्या, जीर्ण विद्युत वाहिन्याचे नुतनीकरण करण्याची मागणी केली. माजी आमदार विजय जाधव यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, गेल्या दोन वर्षात उर्जामंत्री ना. बावनकुळे यांच्यामुळे जिल्ह्यातील विजेच्या अनेक समस्या सुटल्या आहेत. यापुढेही त्यांनी वाशिम जिल्ह्याकडे विशेष लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांनी केले. सूत्रसंचालन अकोला परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी केले.

*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे