वाशिम जिल्ह्यातील विद्युत यंत्रणा सक्षमीकरणासाठी १५० कोटी रुपयांचा निधी - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे




·         शिरपूर-खंडाळा विद्युत उपकेंद्राचे लोकार्पण
·         राज्यात मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना राबविणार
·         शेतकऱ्यांना ऊर्जा बचत करणारे कृषीपंप देणार
·         राज्यातील शेतकऱ्यांना आणखी १० हजार सौर कृषीपंप मिळणार  
वाशिम, दि. १७ :  विद्युत सक्षमीकरणासाठी वाशिम जिल्ह्याकरिता १५० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याने जिल्ह्यातील वीज विषयक बहुतांशी प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याचे प्रतिपादन ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मालेगाव तालुक्यातील शिरपूर-खंडाळा येथील ३३/११ के.व्ही. विद्युत उपकेंद्राच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हा परिषद सदस्य शबानाबी मोहम्मद इमदाद, मालेगाव पंचायत समितीच्या सभापती मंगला गवई, शिरपूरच्या सरपंच सुनिता अंभोरे, राजू पाटील राजे, महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, अधीक्षक अभियंते विनोद बेथारीया, अनिल डोये, राकेश जनबंधू आदी उपस्थित होते.
ना. बावनकुळे म्हणाले की, ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राला मजबुती देण्यासाठी राज्य शासन सर्वंकष प्रयत्न करीत आहे. गेल्या दोन वर्षात विद्युत यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच राज्यातील ३ लाख १० हजार शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना वीज जोडणी देण्यात आली आहे. याकरिता आतापर्यंत १२०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कृषीपंपांना वीज जोडण्या मिळण्यासाठी नवीन ३ लाख अर्ज प्राप्त झाले असून याकरिता आणखी १२०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आगामी काळात शेतकऱ्यांना वीज जोडणी बरोबरच वीज बचत करणारे कृषीपंप ५० टक्के अनुदानावर पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे वीज बचतीबरोबरच शेतकऱ्यांचा खर्च कमी होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांना सौर कृषीपंपाचा लाभ मिळावा, याकरिता आणखी १० हजार सौर कृषीपंप मंजूर करण्यात आले आहेत. याबरोबरच राज्यात मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेंतर्गत १ हजार कृषीपंपांच्या गटाला पीपीपी तत्वावर स्वतंत्र्य सौर वाहिनी निर्माण करून सकाळी ६ ते सायंकाळी ६ या कालावधीत दिवसाची १२ तास वीज उपलब्ध करून देणार असल्याचेही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी सागितले.
वाशिम जिल्ह्यातील विद्युत यंत्रणा सक्षम करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणार आहे. जिल्ह्यातील अतिभारीत झालेली वीज यंत्रणा सुधारण्यासाठी विद्युत उपकेंद्र व रोहीत्रांची क्षमता वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या प्रलंबित वीज जोडण्या देता येतील. पैनगंगा बॅरेज परिसरातील कृषीपंपांना वीज जोडण्याचा प्रश्न महत्वाचा असून याकरिताही लवकरच निधी उपलब्ध करून देणार असल्याचे ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी सागितले. सध्याचे युग हे आधुनिकीकरणाचे युग असून यामध्ये वीज खात्याची महत्त्वाची जबाबदारी राहणार आहे. त्यासाठी महावितरणने माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांच्या सुविधेसाठी मोबाईल अॅप निर्माण केले आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहनही ना. बावनकुळे यांनी केले.
जिल्ह्यातील कृषीपंप वीज जोडण्याचा गेल्या पंधरा वर्षातील अनुशेष गेल्या अडीच वर्षात पूर्ण झाला असल्याचे सांगून वीज यंत्रणेत सुधार झाल्याचे खा. भावना गवळी यांनी यावेळी सांगितले. याबद्दल त्यांनी ऊर्जामंत्री ना. बावनकुळे यांचे ‘ऊर्जाशील मंत्री’ म्हणून कौतुक केले. आ. पाटणी म्हणाले, ना. बावनकुळे यांच्यामुळे जिल्ह्यातील विजेच्या अनेक प्रलंबित समस्या मार्गी लागल्या असून अनेक ठिकाणी नवीन उपकेंद्र व रोहित्र उभारणी झाली आहे. प्रलंबित कृषीपंपांना वीज जोडण्याच्या कामास गती मिळाली असून आगामी काळातही वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी आणखी निधी देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. आ. झनक यांनी शिरपूर-खंडाळा उपकेंद्राच्या निर्मितीमुळे या भागातील शेतकऱ्यांना योग्य दाबाने व अखंडित वीज मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगतिले. प्रास्ताविक महावितरणचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रभाकर लहाने यांनी तर आभार प्रदर्शन कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांनी केले.
शिरपूर-खंडाळा विद्युत उपकेंद्राविषयी थोडक्यात...
·         शिरपूर-खंडाळा विद्युत उपकेंद्रासाठी ३ कोटी ५० लक्ष रुपये खर्च करण्यात आला आहे.
·         या उपकेंद्रात ५ एम.व्ही.ए. क्षमतेचे दोन पॉवर ट्रान्सफार्मरची उभारणी करण्यात आली आहे.
·         या उपकेंद्रातून ११ के.व्ही. क्षमतेच्या ५ स्वतंत्र वीज वाहिन्याद्वारे वीज वितरण होणार आहेत.

·         यामुळे २३ गावांमधील वीज ग्राहकांना योग्य दाबाने व अखंडित वीज पुरवठा मिळण्यास मदत होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे