कृषी विकासाच्या योजना राबविण्यास प्राधान्य - पालकमंत्री संजय राठोड
·
वाशिम येथे
महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण
·
पाणी टंचाई
निवारणार्थ २ कोटी १७ लक्ष रुपयांचा आराखडा
·
खरीप हंगामात ११५०
कोटी पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट्य
वाशिम, दि. ०१ : राज्यात शेती व शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष
प्रयत्न केले जात आहेत. याकरिता कृषी विकासासाठी योजना राबविण्यास प्राधान्य
देण्यात येत असून जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे योजनेची जिल्ह्यात
प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिम
जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित
मुख्य प्रशासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते.
याप्रसंगी
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, वाशिमचे नगराध्यक्ष
अशोक हेडा, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश
हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश
पाटील, वाशिमच्या उपविभागीय अधिकारी कु. क्रांती डोंबे, जिल्हा नियोजन अधिकारी
सुरेंद्र गवळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. एन. बी. पटेल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, तहसीलदार
बळवंत अरखराव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री ना. राठोड म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानातून गेल्या दोन
वर्षांमध्ये जिल्ह्यात सुमारे ६ हजार कामे पूर्ण झाली. त्यामुळे ३७ हजार ८६७
टीसीएम अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाला. याद्वारे
३५ हजार हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची सोय झाली आहे. तसेच मागेल
त्याला शेततळे योजनेतून जिल्ह्यात ६७४ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहे. धडक सिंचन
विहीर योजनेतून जिल्ह्यात ५ हजार ९०० विहिरींचे काम पूर्ण झाले असून महात्मा गांधी
राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६ हजार विहिरी देण्याचे
उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी २ हजार ७५०
विहिरींचे काम सुरु आहे. उर्वरित विहिरींचे कामही लवकरच सुरु होईल.
सन २०१६-१७ मध्ये २ हजार ५३६ कृषी पंपांना वीज जोडणी
देण्यात आली आहे. प्रलंबित वीज जोडण्या देण्यासाठी व पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण
करण्यासाठी इन्फ्रा-२ योजना तीन टप्प्यात राबविण्यात येत आहे. मार्च २०१५
पर्यंतच्या पेड पेंडिंग वीज जोडण्या मे २०१७ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. ठिबक
सिंचन, तुषार सिंचन संचसाठी सन २०१६-१७ मध्ये ११ हजार ३७६ शेतकऱ्यांना १० कोटी
रुपये अनुदान दिले आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतून पुढील ५
वर्षांसाठी १ हजार ३४० कोटींचा कृती आराखडा तयार झाला आहे. येत्या पाच वर्षामध्ये
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी राज्य शासनाने उन्नत शेती, समृद्ध शेतकरी
अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
आगामी खरीप हंगामाच्या अनुषंगाने प्रशासनाची सर्व
तयारी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांना खते व बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिले
जाणार आहे. यावर्षी कमीत कमी दीड लाख शेतकऱ्यांना पिक कर्जाचा लाभ देण्याचे
उद्दिष्ट आहे. याकरिता खरीप हंगामात १ हजार १५० कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे
ठरविले आहे. १ एप्रिल पासून कर्ज वितरणास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत २५ हजार ३८३
शेतकऱ्यांना २०७ कोटी ८० लक्ष रुपये पिक कर्ज वितरीत करण्यात आले आहे. वेळेत पिक
कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ
दिला जात आहे. या अंतर्गत सन २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील ३५ हजार ६१४ शेतकऱ्यांनी
या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांना ५ कोटी ४४ लाख रुपयांची व्याज सवलत देण्यात
आल्याची माहिती पालकमंत्री ना. राठोड यांनी दिली.
नाफेड मार्फत जिल्ह्यात २ लाख क्विंटल पेक्षा अधिक तूर
खरेदी करण्यात आली आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांना सहाय्य करण्याकरिता तुरीसाठी
बाजार हस्तक्षेप योजना राबविण्यात येत आहे. दि. २२ एप्रिल २०१७ पर्यंत तूर खरेदी
केंद्रांवर आवक होऊन नोंद झालेल्या जिल्ह्यातील सुमारे २५ हजार क्विंटल तुरीची या
योजने अंतर्गत खरेदी होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी
अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेतून आतापर्यंत जिल्ह्यातील २४
लाभार्थ्यांना ४८ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली असल्याचे पालकमंत्री यावेळी
म्हणाले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जिल्हाधिकाऱ्यांना
प्राप्त झालेल्या २ कोटी रुपये विशेष निधीतून भामदेवी गावामध्ये २ हजार ५८०
रोपांची लागवड करण्यात आली आहे. १९ शेतकऱ्यांना तुषार सिंचन संच, ९ विद्युत
कृषीपंप वितरीत करण्यात आले आहेत. या गावामध्ये १० शेततळ्यांचे व ४ शेडनेट
उभारणीचे काम सुरु आहे. येथील शेतकऱ्यांना १७० दुधाळ म्हशी व १३ शेळी गटांचे वाटप
करण्यात आले आहे. याठिकाणी १ हजार लिटर क्षमतेचा मिल्क प्रोसेसिंग युनिट उभारण्यात
आले. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झाल्याचे
पालकमंत्री ना. राठोड यांनी सांगितले.
महाराजस्व
अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत आहे. या अभियानाच्या माध्यमातून
नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी तीनही उपविभागीय स्तरावर समाधान
शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. कारंजा येथे २७ मे, मंगरूळपीर येथे २८ मे आणि
वाशिम येथे २९ मे रोजी समाधान शिबीर होईल. या शिबिरांचा लाभ जास्तीत जास्त
नागरिकांनी घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले. शेतकऱ्यांना एका
क्लिकवर जुने अभिलेख उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एटीडीएम मशीन
कार्यान्वित करण्यात आली आहे. १९ फेब्रुवारी २०१७ पासून जिल्ह्यातील खातेधारकांचे
अद्यावत सातबारा ‘आपले सरकार’ वेब पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. एडीट
मोड्यूलमध्ये वाशिम जिल्ह्याचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे
शेतकऱ्यांना अचूक व अद्ययावत ऑनलाईन सातबारा मिळणे शक्य झाले असल्याचे त्यांनी
सांगितले.
शहरी
भागात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे रिसोड, मंगरूळपीर आणि कारंजा
नगरपरिषद हागणदारीमुक्त झाली आहे. शहरी भागात ८ हजार ८६८ वैयक्तिक शौचालयांचे
बांधकाम पूर्ण झाले आहे. शहरी भागातील स्वच्छ भारत अभियानमध्ये वाशिम जिल्हा
राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. या अभियानातून ग्रामीण भागात ३८ हजार १३७ वैयक्तिक
शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तसेच कारंजा तालुका हागणदारीमुक्त घोषित झाला
आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून ग्रामीण भागात ३ हजार ४५३ घरुकुलांना मंजुरी
देण्यात आली आहे. यापैकी २ हजार १८९ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत करण्यात आला
आहे. शहरी भागामध्ये या योजनेतून पुढील ५ वर्षामध्ये ८ हजार ७९ घरांची उभारणी
होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा
क्रीडा संकुल येथे १ कोटी ११ लाख रुपये निधीतून बॅडमिंटन सिंथेटिक कोर्ट, दोन लॉन
टेनिस सिंथेटिक कोर्ट व बास्केटबॉल मैदानाची निर्मिती करण्यात आली आहे. याठिकाणी २
कोटी ५० लाख रुपये निधीतून जलतरण उभारणीचे कामही प्रगतीपथावर आहे. अद्यावत जिल्हा
ग्रंथालय इमारत, नियोजन भवन इमारत व विस्तारित शासकीय विश्रामगृहाचे कामही अंतिम
टप्प्यात असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सागितले. वाशिम येथे नाट्यगृह, टेम्पल
गार्डनमध्ये अॅडव्हेंचर पार्क, तारांगण उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. वाशिम नगर
परिषद अंतर्गत ३४ कोटी ८१ लाख रुपये निधीतून भूमिगत गटार योजना व एस.टी.पी. प्लँट
कार्यान्वित करण्यात करण्यात आला आहे. एस.टी.पी. प्लँट सुरु करणारी वाशिम ही
विदर्भातील पहिलीच नगरपरिषद ठरली आहे. वाशिम नगरपरिषद क्षेत्रात ८१ कोटी ५१ लाख
रुपयांचा रस्ते विकास प्रकल्प प्रगतीपथावर असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी
सांगितले.
बंजारा
समाज बांधवांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी तीर्थक्षेत्राचा प्रसिद्ध
कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी तयार केलेल्या आराखड्यानुसार विकास होणार आहे. पहिल्या
टप्प्यातील २५ कोटी रुपयांच्या कामांना जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली असून हा
प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या कामांना लवकरच प्रारंभ होणार
असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
पाणी
टंचाईवर मात करण्यासाठी २ कोटी १७ लक्ष रुपयांचा कृती आराखडा
आगामी
काळात जिल्ह्यातील २५२ गावांमध्ये पाणी टंचाईची निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यावर उपाययोजना करण्यासाठी २ कोटी १७ लाख रुपयांच्या कृती आराखड्यास मंजुरी
देण्यात आली आहे. यापैकी ३३ गावांमध्ये ३९ उपाययोजना कार्यान्वित करण्यात आल्या असल्याचे
पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम
अंतर्गत जिल्ह्यातील १० प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार
आहे. याकरिता १४ कोटी ११ लाख रुपये
किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सन २०१६-१७ मध्ये
जिल्हा वार्षिक योजनेतून ६ पाणी पुरवठा योजनांसाठी २ कोटी २९ लाख रुपये निधी
उपलब्ध करून देण्यात आला होता. या योजनांमधून लवकरच पाणी पुरवठा सुरु होणार असल्याचे
पालकमंत्र्यांनी यावेळी म्हणाले.
प्रारंभी
पालकमंत्री ना. राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राखीव पोलीस
निरीक्षक देविदास इंगळे व राखीव पोलीस उपनिरीक्षक सुनील बोरकुटे यांच्या
नेतृत्वाखालील पथकाने परेड संचलन केले. यामध्ये श्वान पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक,
आरोग्य विभागाचा उष्माघात विषयी जनजागृती करणारा चित्ररथ व रुग्णवाहिका, जिल्हा
परिषदेचा स्वच्छ भारत अभियान विषयक रथाचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेचे शिक्षक मोहन शिरसाट व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
अधिकारी बालासाहेब बोराडे यांनी केले.
Comments
Post a Comment