जिल्हा क्रीडांगणावर निनादला भारतभूमीच्या गौरवाचा सूर देशप्रेम, निष्ठा आणि अभिमानाचे प्रतीक असलेले “वंदे मातरम” गीत झंकारले




जिल्हा क्रीडांगणावर निनादला भारतभूमीच्या गौरवाचा सूर

 देशप्रेम, निष्ठा आणि अभिमानाचे प्रतीक असलेले “वंदे मातरम” गीत झंकारले

राष्ट्रीय गीतनिर्मितीला १५० वर्षे पूर्ण
सार्धशताब्दी महोत्सवाला उत्साहात सुरुवात 

वाशिम, (जिमाका) स्वातंत्र्य सेनानी व थोर कवी बंकिमचंद्र चटर्जी यांनी क्रांतीची जाज्वल्य ज्योत आपल्या गीतातून सबंध देशभर पेटवली. देशप्रेम, निष्ठा आणि अभिमानाचे प्रतीक असलेले “वंदे मातरम” हे गीत आज पुन्हा एकदा प्रत्येकाच्या ओठांवर झंकारले. वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त  साजरा होत असलेला “वंदे मातरम सार्धशताब्दी महोत्सव” वाशिम जिल्ह्यातही उत्साहात पार पडला.
  'वंदे मातरम' या गीत रचनेला १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत जिल्हा क्रीडांगणावर दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वा. 'वंदे मातरम' गायनाचा सामूहिक सोहळा संपन्न झाला. 
   व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश बोरा, प्रमुख अतिथी वाशिम तहसीलदार निलेश पळसकर, प्रमुख वक्ते जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड अभिजित व्यवहारे,  प्राचार्य प्रविण गुल्हाने, जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी सचिन नखाते, गटनिदेशक श्री परळीकर,नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
     प्रास्ताविक वैभव आढाव यांनी केले .“वंदे मातरम” गीताच्या सार्धशताब्दीचे औचित्य सांगत, या गीताचा इतिहास, त्यातून व्यक्त होणारी देशभक्ती आणि मातृभूमीवरील प्रेम याची सुंदर मांडणी केली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात या गीताने निभावलेली प्रेरणादायी भूमिका त्यांनी उपस्थितांसमोर उलगडून सांगितली.

प्रमुख वक्ते अभिजीत व्यवहारे म्हणाले, “वंदे मातरम” या गीताचा इतिहास आणि त्यामागील प्रेरणादायी पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना समजून घेतली पाहिजे, असे  त्यांनी व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांना या गीताने स्वातंत्र्यलढ्यात निर्माण केलेल्या राष्ट्रीय एकतेची आणि देशभक्तीची जाणीव करून दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश बोरा यांनी विद्यार्थ्यांना देशहितासाठी आपली कर्तव्ये पार पाडण्याचे आवाहन केले. “वंदे मातरम” मधून मिळणाऱ्या प्रेरणेचा उपयोग जीवनात करून देशसेवेच्या कार्यात योगदान द्यावे,असे मार्गदर्शन त्यांनी केले. 

   या कार्यक्रमात जिल्ह्यातील शालेय  विद्यार्थ्यांनी एकत्र येत 'वंदे मातरम' गीताचे सामूहिक गायन करून देशभक्तीचा जागर केला. यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी वंदेमातरम् या गीताचे महत्व पटवून देणारी लघु नाटिका सादर केली. तर राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यानी या गीतावर नृत्य सादर केले नृत्य सादर केले.  
    भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात ‘वंदे मातरम्’ या गीताचा विशेष उल्लेखनीय प्रभाव राहिला आहे आणि हे गीत स्वातंत्र्यसैनिकांसाठी प्रेरणास्त्रोत बनले होते. सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी या गीताने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. थोर कवी आणि तत्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली रचलेल्या ‘वंदे मातरम’ या गीताला शुक्रवारी, ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ७ नोव्हेंबर २०२५ ते ७ नोव्हेंबर २०२६ या दरम्यान एकूण चार टप्प्यात  विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
             याअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे मंत्रालयात ‘वंदे मातरम्’ गीत ‘सार्ध शताब्दी’ महोत्सवासाची आज सुरुवात झाली आहे. या महोत्सवासाच्या माध्यमातून कौशल्य विकास विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने  वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. 
    जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे संचालन शिल्प निदेशक माधुरी शेळके तर उपस्थितांचे आभार पंजाबराव चव्हाण यांनी मानले. शालेय विद्यार्थी, तरुण, महिला, ज्येष्ठ वाशिमकर या उपक्रमात सहभागी झाले.
  कार्यक्रम यशस्वीतेसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समिती अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.सामूहिक वंदे मातरम गीत गायनासाठी  हॅपी फेसेस शाळेच्या विद्यार्थी व संगीत शिक्षकांनी नेतृत्व केले.

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित