'आहोत आम्ही मतदार, मतदान हक्क अवश्य बजावणार ’ मतदान जनजागृती रॅलीने वाशिमकरांचे लक्ष वेधले जिल्हाधिकाऱ्यांकडून रॅलीला हिरवा झेंडा; विद्यार्थ्यांच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमले
‘आहोत आम्ही मतदार, मतदान हक्क अवश्य बजावणार!’
मतदान जनजागृती रॅलीने वाशिमकरांचे लक्ष वेधले
जिल्हाधिकाऱ्यांकडून रॅलीला हिरवा झेंडा; विद्यार्थ्यांच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमले
वाशिम, दि. २० नोव्हेंबर (जिमाका)
नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका २०२५ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत . या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदान जनजागृतीवर मोठा भर देण्यात येत आहे. वाशिममध्ये आज भव्य मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. ‘आहोत आम्ही मतदार, मतदान हक्क अवश्य बजावणार’, ‘तुमचे मतदान तुमचा अधिकार’, ‘सुयोग्य प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करा’ अशा प्रभावी घोषणांनी रॅलीने शहराचे लक्ष वेधून घेतले.
रॅलीची सुरुवात नगरपरिषद कार्यालयातून झाली. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत रॅलीची सुरुवात होताच परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांच्या सहभागातून लोकशाही बळकट व्हावी हा संदेश देत रॅली पुढे सरकत मार्गस्थ झाली.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार निलेश पळसकर, न.प. मुख्याधिकारी निलेश गायकवाड, स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी संजय ससाणे, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, एनसीसी अधिकारी अमोल काळे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी स्वाक्षरी फलकावर स्वाक्षऱ्या करून मतदानाची शपथ घेतली. तसेच विशेष तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर नागरिकांसह विद्यार्थ्यांनी सेल्फी काढत मतदान सजगतेचा संदेश सोशल मीडियाद्वारेही पोहोचवला.
विद्यार्थ्यांचे आकर्षक पथसंंचलन आणि लक्षवेधी पथनाट्य सादरीकरण
रॅलीत श्री. बाकलीवाल विद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांचे पतसंंचलन विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांनी सुसंघटित पद्धतीने मिरवणूक काढत मतदानाबाबत जनजागृतीपर फलक प्रदर्शित केले.
त्याचप्रमाणे, एनसीसी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मतदान जनजागृती पथनाट्याने प्रेक्षकांची दाद मिळवली. ‘एक मत देश घडवते’, ‘मतदान न करणारा तक्रार करण्याचा अधिकार गमावतो’ अशा प्रभावी संदेशांनी नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.
मोठ्या संख्येने सहभाग
रॅलीत एनसीसी, स्काऊट-गाईड, विविध शाळांतील विद्यार्थी, अधिकारी-कर्मचारी, नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी अशा मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग दिसून आला. सर्वांनी घोषणाबाजी करत मतदारांपर्यंत लोकशाहीचा संदेश पोहोचवला. रॅली शहरातील प्रमुख मार्गाने फिरत पून्हा नगरपरिषद येथे समारोप करण्यात आला. रॅलीपूर्वी सर्व मान्यवर, अधिकारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा करून लोकशाही मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला.
संचालन उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांनी केले.
Comments
Post a Comment