·
वाशिम
येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात
·
जिल्हाधिकारी
कार्यालय प्रांगणात पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
वाशिम, दि. १५ (जिमाका) : आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत
पोहचवून कृषि उत्पन्न वाढविणे व शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनविण्यासाठी राज्य शासन
प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात सुद्धा शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून शेतीसाठी अधिकाधिक
सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री
शंभूराज देसाई यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते
झाले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते.
यावेळी
पद्मश्री नामदेव कांबळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, खासदार भावना
गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा
परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहायक
जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी
शैलेश हिंगे यांच्यासह लोकप्रतिनिधी, माजी सैनिक, अधिकारी, कर्मचारी व पत्रकार
बांधव यांची उपस्थित होते.
पालकमंत्री
श्री. देसाई म्हणाले, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्या देशाने अनेक क्षेत्रात
वेगाने प्रगती केली आहे. जागतिक पातळीवर आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
त्याचप्रमाणे देशामध्येही महाराष्ट्राने गतिमान विकास साधत आपली वेगळी ओळख निर्माण
केली आहे. यामध्ये कृषि क्षेत्राचे योगदान महत्वपूर्ण आहे. कोरोना काळातही कृषि
क्षेत्राने अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावला. त्यामुळे कृषि क्षेत्रामध्ये
अधिकाधिक सुविधा पुरवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न
करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने महात्मा
ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले
आहे. तसेच शेतकऱ्यांना ३ लाख रुपये पर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध
करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शेतीसाठी पतपुरवठा वाढविण्यासाठी
विशेष प्रयत्न केले जात आहेत. पतपुरवठा न करणाऱ्या बँकांविरुद्ध कठोर भूमिका
घेण्यात येत आहे.
जिल्ह्यातील
बहुतांशी शेती निसर्गावर अवलंबून असल्याने शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून
उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण
देण्यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुल उभारण्याचा निर्णय
घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना एकाच छताखाली अशाप्रकारच्या अद्ययावत सुविधा उपलब्ध
असलेला हा पहिलाच प्रकल्प आहे, असे पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
जिल्ह्याला
विकासाच्या प्रवाहात पुढे नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गेल्या दोन
वर्षामध्ये जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमध्ये वाढ करून घेण्यात आली आहे. सर्व
लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने जिल्ह्याच्या विकासासाठी यापुढेही प्रयत्न केले
जाणार असून कोरोना काळातही जिल्ह्यातील विकास कामांना अधिकाधिक निधी उपलब्ध
करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री श्री. देसाई यावेळी म्हणाले.
यावेळी
पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते वीरपत्नींचा सत्कार करण्यात आला. कोरोना योद्धा
म्हणून काम करणारे डॉक्टर, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार यांना स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले
होते. कार्यक्रमाचे संचालन मोहन शिरसाट यांनी केले.
Comments
Post a Comment